पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित केल्याबद्दल भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानी चॅनल एआरवाय न्यूजशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “जर आम्हाला वाटले की आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि पाणी देखील आमच्या सुरक्षेचा भाग आहे, तर आम्ही निश्चितपणे भारताच्या विरोधात युद्ध करू.” त्यांनी असेही म्हटले की, भारताने पाकिस्तानसाठी पाण्याची उपलब्धता वेगाने प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले, तर लष्करी कारवाईचा विचार केला जाऊ शकतो. (Indus Water Treaty)
एप्रिल 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांच्या मृत्यूनंतर भारताने 1960 चा सिंधू पाणी करार निलंबित केला होता. भारताचे म्हणणे आहे की, पाकिस्तान सीमापार दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत हा करार पुन्हा सुरू केला जाणार नाही. (Indus Water Treaty)
भारत-पाकमधील सिंधू पाणी करार काय आहे?
सिंधू नदी प्रणालीमध्ये एकूण 6 नद्या आहेत – सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. यांच्या काठावरील प्रदेश सुमारे 11.2 लाख चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. यापैकी 47% भूभाग पाकिस्तानमध्ये, 39% भारतात, 8% चीनमध्ये आणि 6% अफगाणिस्तानमध्ये आहे. या सर्व देशांमधील तब्बल 30 कोटी लोक या प्रदेशात राहतात. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीपूर्वीच भारताच्या पंजाब आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतादरम्यान नद्यांच्या पाण्याच्या वाटणीवरून वाद सुरू झाला होता. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या अभियंत्यांमध्ये ‘स्टँडस्टिल करार’ झाला. या अंतर्गत दोन मुख्य कालव्यांमधून पाकिस्तानला पाणी मिळत राहिले. हा करार 31 मार्च 1948 पर्यंत चालला. (Indus Water Treaty)
1 एप्रिल 1948 रोजी जेव्हा करार लागू राहिला नाही, तेव्हा भारताने दोन्ही कालव्यांचे पाणी थांबवले. यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील 17 लाख एकर जमिनीवरील शेती उद्ध्वस्त झाली. पुन्हा झालेल्या करारामध्ये भारत पाणी देण्यास राजी झाला. त्यानंतर 1951 पासून 1960 पर्यंत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये पाण्याच्या वाटणीवरून चर्चा झाली आणि अखेरीस 19 सप्टेंबर 1960 रोजी कराची येथे भारताचे पंतप्रधान नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांच्यात स्वाक्षऱ्या झाल्या. याला सिंधू जल करार किंवा सिंधू जलसंधि असे म्हटले जाते. (Indus Water Treaty)
पाकिस्तानवर परिणाम
पाकिस्तानात शेतीच्या 90% जमिनीला, म्हणजे 4.7 कोटी एकर क्षेत्रात, सिंचनासाठी पाणी सिंधू नदी प्रणालीतून मिळते. पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 23% आहे आणि यामुळे 68% ग्रामीण पाकिस्तानी लोकांची उपजीविका चालते. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील सामान्य लोकांबरोबरच तिथली आधीच बिकट असलेली अर्थव्यवस्था आणखी वाईट होऊ लागली आहे. पाकिस्तानमधील मंगल आणि तारबेला जलविद्युत धरणांना पाणी मिळत नाहीये. यामुळे पाकिस्तानच्या वीज उत्पादनात 30% ते 50% पर्यंत घट होऊ शकते. तसेच औद्योगिक उत्पादन आणि रोजगारावर परिणाम होईल. (Indus Water Treaty)
Join Our WhatsApp Community

