‘Chala Basu Ya’ Restaurant मध्ये मद्यधुंद महिलेकडून पोलीस महिला अधिकारी यांना मारहाण

मारहाणीत जखमी झालेल्या महिला पोलीस अधिकारी यांच्यावर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे.

118
'Chala Basu Ya' Restaurant मध्ये मद्यधुंद महिलेकडून पोलीस महिला अधिकारी यांना मारहाण
'Chala Basu Ya' Restaurant मध्ये मद्यधुंद महिलेकडून पोलीस महिला अधिकारी यांना मारहाण

दादरच्या वीर सावरकर मार्गावर असणाऱ्या एका बार अँड रेस्टोरंटमध्ये निर्भया पथकातील महिला पोलीस अधिकारी यांना मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या बँक अधिकारी महिलेने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या मारहाणीत जखमी झालेल्या महिला पोलीस अधिकारी यांच्यावर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. याप्रकरणी दादर पोलिस ठाण्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिला बँक अधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहणाऱ्या क्षितिजा शिरोडकर ही महिला दादर येथील एका खाजगी बँकेत बँक अधिकारी म्हणून नोकरीला आहे. मंगळवारी सायंकाळी क्षितिजा ही महिला बँकेतील एका पुरुष सहकाऱ्यासोबत दादर येथील वीर सावकर मार्गावर असणाऱ्या ‘चला बसू या’ या बार अँड रेस्टोरंटमध्ये मद्यपान करण्यासाठी बसले होते. मद्यधुंद अवस्थेत क्षितिजा आणि तिचा पुरुष शाळकरी हे दोघे रेस्टोरंटच्या बाथरूममध्ये एकत्र जात असताना रेस्टोरंटच्या वेटरने त्यांना रोखले व एका वेळी एकच व्यक्ती बाथरूममध्ये जाऊ शकतो असे वेटरने सांगितले असता क्षितिजा आणि तिचा सहकारी याने दोघांना एकत्र जायचे असल्याचे सांगून वेटर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, वेटरने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर फोन केला.

काही वेळातच दादर पोलीस ठाण्याचे निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक गौरी दाते या पथकासह रेस्टोरंट मध्ये दाखल झाल्या. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेला समजावून सांगत असताना मद्याच्या नशेत असलेल्या क्षितिजा या महिलेने पोलिस अधिकारी दाते यांची कॉलर पकडून “माझी सीपी पर्यत ओळख आहे, मी सीपीला कॉल लावते आणि तुझी नोकरीच घालवते,” अशी धमकी देऊन पोलीस उपनिरीक्षक यांना मारहाण केली. दरम्यान दाते यांनी पोलीस ठाण्याला फोन करून मदतीसाठी पोलिसांची अधिक कुमक मागवली.

(हेही वाचा – Railway First Woman Chairman : रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या जया वर्मा सिन्हा)

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या क्षितिजा या बँक अधिकारी महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात देखील या महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिला कसेबसे रोखून तिची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी केईएम रुग्णालयात आणल्यानंतर दादर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३३२ (सरकारी कर्मचारी/अधिकारी यांना कर्तव्य करण्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने हानी पोहचवणे) ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) ५०४ (चिथावणी देणे) ५०६ (धमकी देणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महिला आरोपीला अटक न करता तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती वपोनि. राजेंद्र आव्हाड यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.