धक्कादायक! मुंबईत दररोज २ अत्याचार आणि ४ अपहरणाच्या घटना

98

मुंबईत दररोज २ लैगिंग अत्याचाराच्या घटना आणि ४ अपहरणाच्या घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यामध्ये होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबईत ७० लैगिंग अत्याचार आणि ११३ अपहरणाच्या घटना मुंबईत घडल्या आहे. त्यात सर्वाधिक अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळांवरील ही अधिकृत आकडेवारी असून या आकडेवारीवरून पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

( हेही वाचा : सैफी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू आणि एफडीएची कारवाई)

महिलांसाठी सुरक्षित असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत महिलांवरील लैगिंग अत्याचार ,अपहरणाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात एका दिवसात २ अत्याचार आणि ४ अपहरणाच्या घटनांची नोंद होत आहे. ही आकडेवारी मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली असून मागील ऑक्टोबर महिन्यात ७० लैगिंग अत्याचाराच्या घटना एकट्या मुंबईत घडल्या आहे, त्यात ३७ अल्पवयीन मुलीचा समावेश असून ७० गुन्ह्यापैकी ५४ गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्याच्या कालावधीत मुंबईत ८०७ अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यात ४९९ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, यापैकी ७२९ गुन्ह्याची उकल करण्यात आलेली असून ७८ गुन्हे अद्याप प्रलंबित आहे. मागील वर्षी २०२१ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिण्यात ७६२ अत्याचाराचे गुन्हे दाखल होते त्यापैकी ६६७ गुन्हे उघडकीस आले होते. २०२१ च्या तुलनेत यंदाच्या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आकडेवारी वाढली

अत्याचाराच्या घटनांबरोबर अपहरणाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुंबईत सरासरी दररोज ४ अल्पवयीन मुलींचे अपहरण होत आहे. या अपहरणाच्या घटनांमध्ये १४ ते १७ वयोगटातील मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबईत ११३ मुलीचे अपहरण करण्यात आले असून त्यापैकी ६५ मुलीचा शोध घेण्यात आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील दहा महिन्याची अपहरणाच्या गुन्ह्यांची सरासरी बघितली असता मागील दहा महिन्यात ९३५ अल्पवयीन मुलीचे, तर ७ महिलांचे अशा एकूण ९४२ अपहरणाच्या घटनाची नोंद झाली, त्यापैकी ८२५ गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी वाढली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ या दहा महिन्यात ९१७ गुन्हे दाखल झाले होते.

मुंबईत वाढती लोकसंख्या, सोशल मीडियामुळे या घटनांमध्ये वाढ होत असून त्यातील अत्याचाराच्या अनेक घटना लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्ह्यापैकीं अनेक गुन्हे हे ओळखीतून घडलेले आहेत, पोलिसांकडून याबाबत दाखल घेऊन तात्काळ या गुन्हयाची नोंद करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे सोशल मीडिया जबाबदार असून त्यातून ओळख होऊन १४ ते १७ वयोगटातील मुली घर सोडून जाण्याच्या अधिक घटनाची नोंद होत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.