Mumbai Police : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रभर ‘ऑपरेशन ऑल आऊट

ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी लपून बसलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी शोधून काढले आहे.

146
संपूर्ण शहर नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी सज्ज असताना, या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटे पर्यत ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले आहे. ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी लपून बसलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी शोधून काढले आहे. या कारवाईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस आयुक्त,सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी या  ऑपरेशन ऑल आऊट मध्ये भाग घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे २ वाजेपर्यंत ही ‘ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या दरम्यान २१४ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि परिणामी १ हजार ११५ लोकांची तपासणी करण्यात आली. यापैकी एकूण २४८ व्यक्ती विविध गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एनडीपीएस कायद्यांतर्गत ६  जणांवर कारवाई-
 या कारवाईदरम्यान पोलिसांनी शहराच्या विविध भागातून ४६ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. एनडीपीएस कायद्यांतर्गत ६  जणांवर कारवाई करण्यात आली आहे.अवैध रहिवासी रोखण्यासाठी पोलिसांनी हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊससह ९४४ आस्थापनांचीही झडती घेतली. याशिवाय ५५२  संवेदनशील
ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली.
१०८ ठिकाणी नाकाबंदी-
१०८  ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यामध्ये ७ हजार ७३८ दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करून २ हजार ४८४ चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. याशिवाय ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या ६०  जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध धंदे सुरू असलेल्या २२  ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले, त्यात ४३  जणांना अटक करण्यात आली. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हे  दाखल करण्यात आले असून तलवार, चाकू आदी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १२०,१२२ आणि १३५ अन्वये बेकायदेशीरपणे फिरणाऱ्या ११९  जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्याच्या उद्देशाने, ८७ जणांवर कारवाई करण्यात आली ज्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. आठ फरार आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन दरम्यान, ऑपरेशन ऑल आऊटमध्ये सर्व पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस सहभागी झाले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.