Bogus Doctor : ‘मुन्नाभाई’कडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, बारावी शिकलेला ‘कंपाउंडर’ बनला डॉक्टर

धक्कादायक बाब म्हणजे बोगस डॉक्टर परवेज याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न तसेच ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे.

224
Bogus Doctor : 'मुन्नाभाई'कडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, बारावी शिकलेला 'कंपाउंडर' बनला डॉक्टर

मालाड मालवणी येथे १० बेडचे बेकायदेशीररित्या रुग्णालय थाटून मागील अनेक वर्षांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या परवेज अब्दुल अजीज शेख या बोगस डॉक्टरला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. बोगस डॉक्टर परवेज आणि त्याची बीयुएमएस पदवीधर असलेल्या पत्नीविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बोगस डॉक्टर परवेज याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न तसेच ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. (Bogus Doctor)

मालाड मालवणी गेट नंबर ८ या ठिकाणी असलेल्या ‘अजीज पॉली क्लिनिक’ हे रुग्णालय बेकायदेशीरपणे चालविण्यात येत आहे, तसेच या रुग्णालयातील डॉक्टर परवेज यांच्याकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी अथवा प्रमाणपत्र नसल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष १२ च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अजीज पॉली क्लिनिक रुग्णालयात छापा टाकून परवेज अजीज शेख याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय पदवी आणि प्रमाणपत्राबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची पदवी नसल्याचे आढळून आले. त्याची पत्नी साजिया हिने सांताक्रूझ येथील युनानी मेडिकल कॉलेजमधून बीयुएमएसची पदवी घेतली आहे, परंतु तिला अधिकृत औषधे रुग्णालयात ठेवण्यास परवानगी नसताना त्यांनी रुग्णालयात इंजेक्शन, औषधांचा साठा केला आहे. (Bogus Doctor)

(हेही वाचा – Praful Patel : प्रफुल्ल पटेलांना क्लीनचीट; सीबीआयकडे पुरावेच नाहीत)

दरम्यान परवेज याचे शिक्षण बारावी पर्यंत झालेले असून तो पूर्वी एका डॉक्टरकडे कपाउंडर म्हणून काम करीत होता, त्याला कुठल्या आजारावर कुठले औषध दिले जाते, तसेच इंजेक्शन देण्याची माहिती होती. या आधारावर परवेज हा डॉक्टर बनून रुग्णांना हाताळून त्यांना औषधे देत होता. बोगस डॉक्टर (Bogus Doctor) परवेज याच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात २ गुन्हे, कापूरबावडी पोलीस ठाण्यात १ आणि मुलुंड पोलिस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न या सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात परवेज आणि त्याची पत्नी साजिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परवेजला अटक करण्यात आली आहे. (Bogus Doctor)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.