Kalyan-Dombivli Theft : ९५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि मानपाडा पोलिसांचे जाळे; सराईत चोरटा ‘असा’ अडकला

97
मानपाडा पोलिसांच्या समोर अटक केलेला चोरटा आणि पोलिस
Kalyan-Dombivli Theft : ९५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि मानपाडा पोलिसांचे जाळे; सराईत चोरटा 'असा' अडकला
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan-Dombivli Theft                    अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण-डोंबिवलीतील बंद घरे, दुकाने, हॉटेल फोडून चोऱ्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने कल्याणच्या चक्कीनाक्यावर जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी आतापर्यंत १२ मोबाईल फोन, १ पांढऱ्या रंगाची ॲक्टीवा स्कूटर व रोख रक्कम असा एकूण २ लाख ८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतून ७ गुन्ह्यांची मालिका असलेल्या या चोरट्याचा आणखी एक साथीदार असून पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत. (Kalyan-Dombivli Theft)

अनिल संजू रूपवते (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर परिसरात राहणारा आहे. कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या नेतीवलीच्या सूचक नाक्यावरील मोमीन उमर शेख (५९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मानपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोमीन शेख यांचे सूचक नाक्यावर हॉटेल आहे. हॉटेल बंद करून मोमीन हे घरी गेले असता २१ ते २२ मार्चच्या रात्री चोरट्यांनी बंद हॉटेलचे शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कमेसह दोन मोबाईल फोन लांबविले होते. (Kalyan-Dombivli Theft)

(हेही वाचा – Malda Hostage Case भडकवणारा मोफक्कारुल इस्लामचे एमआयएम, तृणमूलशी कनेक्शन; ममता बॅनर्जींचे पितळ उघडे)

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक जयपालसिंह राजपूत, सपोनि सागर चव्हाण, सपोउपनि सुनिल पवार, सुशांत पाटील, संजू मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, केशव भोये, योगेश आडे, महेश झांजुर्णे, अशोक आहेर, विजय आव्हाड आणि सोपान शेळके यांचे पथक तैनात केले. या पथकाने घटनास्थळापासून ते आरोपी अनिल रूपवते राहत असलेल्या उल्हासनगरातील राहूलनगर पर्यंतचे रोडवरील व खासगी असे एकूण ९५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या कॅमेऱ्यांमध्ये अनिल रूपवते आढळून आला होता. याच दरम्यान खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चक्कीनाका परिसरात जाळे पसरले होते. या जाळ्यात सराईत चोरटा अनिल रूपवते अलगद अडकला. (Kalyan-Dombivli Theft)

साथीदार संजू वाघरी लवकर गजाआड

चौकशी दरम्यान त्याने संजू किसन वाघरी याच्या मदतीने चोऱ्या-घरफोड्या केल्याची कबुली दिली. अनिल रूपवते आणि संजू वाघरी या दोघांनी मिळून कल्याण, डोंबिवली व अंबरनाथ परिसरातील ७ ठिकाणी चोऱ्या-घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. मानपाडा, महात्मा फुले चौक, हिललाईन, कोळसेवाडी, टिळकनगर आणि रामनगर पोलिस अनिल रूपवते आणि त्याचा साथीदार संजू वाघरी या दोघा चोरट्यांना जंग जंग पछाडत होते. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अनिल रूपवते याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा साथीदार संजू वाघरी अद्याप हाती लागला नसून पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत. (Kalyan-Dombivli Theft)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.