Dombivli Crime : लेकीच्या रक्षणासाठी पित्याला हरकत घेणे पडले महागात; मद्यधुंद गुंडांनी…

72
गुंडगिरीच्या घटनेत मारहाण होत असलेल्या व्यक्तींचा दृश्य.
Dombivli Crime : लेकीच्या रक्षणासाठी पित्याला हरकत घेणे पडले महागात; मद्यधुंद गुंडांनी...
  • कल्याण, प्रतिनिधी

पश्चिम डोंबिवलीत घडलेल्या संतापजनक घटनेमुळे गुंडांचे राज्य असल्याचे एका घटनेतून स्पष्ट झाले आहे. मुलीकडे पाहिल्याचा जाब विचारल्यामुळे पित्यासह कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. भरवस्तीत मद्यधुंद तरूणांच्या या गुंडगिरीमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून या घटनेचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. एकीकडे पोलिसांना खुले आव्हान देणाऱ्या या गुंडांच्या मागे राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे फरार गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात्मक कारवाई करण्याची मागणी संतप्त रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (Dombivli Crime)

पश्चिमेकडील विजयनगर परिसरात असलेल्या रामदास चाळीत मंगेश पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची लहान मुलगी रविवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत असताना हा सारा प्रकार घडला. ज्या ठिकाणी ही मुलगी खेळत होती, तिथेच काही तरूण त्यांच्या दुचाकीवर बसले होते. त्यातील काही तरूण सातत्याने मंगेश पाटील यांच्या मुलीकडे आशाळभूत नजरेने पाहत होते. आपल्या मुलीकडे अशा प्रकारे पाहिले जात असल्याचे लक्षात आल्यावर वडील मंगेश पाटील यांनी त्या तरूणांना हटकले आणि तुम्ही मुलीकडे का पाहता ? असा सवाल केला. मात्र त्या तरूणांनी नम्रपणे उत्तर देण्याऐवजी मंगेश यांना उलट उत्तर देऊन वाद घालण्यास सुरूवात केली. (Dombivli Crime)

(हेही वाचा – ‘मशाल दिसली की निधी कट’; मंत्री Nitesh Rane यांचा विरोधकांना भर प्रचारसभेत इशारा)

सुरूवातीला वाद वाढू नये म्हणून मंगेश पाटील यांनी माघार घेतली. घडलेला विषय सोडून दिला आणि ते तिथून निघून गेले. मात्र काही वेळातच तानाजी नावाचा तरूण त्याचा मित्र आदित्य आणि इतर काही साथीदारांना घेऊन तिथे आला. दारू ढोसून आलेल्या या टोळक्याने मंगेश यांच्याशी पुन्हा हुज्जत घालण्यास सुरूवात केली. भांडण सोडविण्यासाठी आणि मध्यस्थी करण्याकरिता मंगेश यांचे भाऊ महेश पाटील पुढे आले असता मद्यधुंद तरूणांनी संपूर्ण कुटुंबावर हल्ला चढविला. या टोळक्याने मंगेश, त्यांचा भाऊ महेश आणि महेश यांचा मुलगा साई या तिघांनाही बेदम मारहाण केली. टोळक्याने केलेल्या हिंसक हल्ल्यात महेश पाटील यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. टोळक्याच्या हल्ल्यात ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबतच मंगेश आणि साई हे दोघेही जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. (Dombivli Crime)

राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे गुंडांचे धाडस

या घटनेनंतर पाटील कुटुंबाने तातडीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तानाजीसह आदित्य आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भरगच्च लोकवस्तीत घडलेल्या या हिंसाचाराच्या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप हल्लेखोर हाती लागले नसून पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. या गुंडांच्या मागे राजकारण्यांचा वरदहस्त असावा, त्यामुळेच ते इतके धाडस करू शकतात. पोलिसांनी त्या फरार गुंडांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हे गुंड पुन्हा या घटनेचा वचपा काढतील, अशीही भिती हल्यात जखमी झालेल्या पिडीत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आता पोलिस या प्रकरणात काय कारवाई करतात ? याकडे पिडीत कुटुंबियांसह परिसरातील रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत. (Dombivli Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.