Dombivli : बारमध्ये रक्तरंजित राडा, दोघांवर जीवघेणा हल्ला; नेमकं कारण काय?

कन्नड भाषेत शिवीगाळ केल्याचा संशय, विष्णूनगर पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू

134
Dombivli : बारमध्ये रक्तरंजित राडा, दोघांवर जीवघेणा हल्ला; नेमकं कारण काय?
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli                   पश्चिम डोंबिवलीत शनिवार ते रविवार दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास एका बारमध्ये रक्तरंजित राडा झाला. कन्नड भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या आठ-दहा जणांच्या टोळक्याने पेव्हर ब्लॉक, लोखंडी रॉड आणि झाडांच्या कुंड्या डोक्यात घालून दोघांना जायबंदी केले. हल्लेखोरांनी जखमी झालेल्या एकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन केले. हा सारा प्रकार घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारमध्ये वादावादीच्या अर्थात हिंसक घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना शनिवार-रविवारच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पश्चिम डोंबिवलीतील रेतीबंदर रोडला असलेल्या अतिथी नामक बारसमोर घडली. एका तरूणासह त्याच्या मित्राला ७ ते ८ जणांच्या टोळक्याने अमानुषपणे मारहाण केली. (Dombivli)

​वादाचे नेमके कारण…

या हल्ल्यात जखमी झालेल्या राकेश जैस्वार याने विष्णूनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राकेश हा त्याचा मित्र आकाश गुप्ता याच्यासमवेत अतिथी बारमध्ये गेला होता. या बारमध्ये काही ग्राहक मद्यपान करत बसले होते. आकाश गुप्ता याने कन्नड भाषेत शिवीगाळ केल्याचा तेथे मद्यपान करत बसलेल्या एकाला संशय आला. या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. आकाशने आपल्या मदतीसाठी राकेशला बोलावून घेतले. राकेशने मध्यस्थी करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत तर्राट असलेल्या त्या इसमाने वाद जागीच मिटविण्याऐवजी तो वाढविण्याच्या हेतूने कुणाला तरी फोन करून ७ – ८ जणांना बारमध्ये बोलावून घेतले. (Dombivli)

(हेही वाचा – Mamata Banerjee यांचा मतदारयादीवरून थयथयाट सुरुच; निवडणूक आयुक्तांना लिहिले पत्र)

​लोखंडी रॉडसह झाडाच्या कुंडीने हल्ला

काही वेळातच आलेल्या टोळक्याने राकेश आणि आकाशवर हल्ला चढविला. या टोळक्यातील मेघराज कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी राकेशच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केलाच, शिवाय जमिनीवर असलेली झाडाची कुंडी उचलून त्याच्या कमरेवर मारली. या हल्ल्यात आकाश गुप्ता याच्याही डोक्याला गंभीर इजा होऊन तो खाली पडला. दोघेही जायबंदी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. बारमधील काही लोकांनी राकेश जैस्वार आणि आकाश गुप्ता या रक्तबंबाळ झालेल्या तरूणांना उचलून तातडीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात हलविले. वेळीच उपचार मिळाल्याने दोघा जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. (Dombivli)

बार संस्कृतीच्या विरोधात रहिवाशांत संताप

मारहाणीच्या आणि ओढाताणीच्या दरम्यान राकेश जैस्वार याच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन गायब झाली. हल्लेखोरांपैकी कुणीतरी ही चेन लंपास केल्याचा संशय राकेश जैस्वार याने त्याच्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मेघराज कांबळे आणि त्याच्या ७ ते ८ साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत अशाप्रकारे बार सुरू ठेवल्यास कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. विशेष म्हणजे अशा घटनांमुळे बारच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या बार संस्कृतीच्या विरोधात रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.