…म्हणून ‘त्याने’ आरडीएक्स असल्याची पोलिसांना दिली खोटी खबर!

126
...म्हणून ‘त्याने’ आरडीएक्स असल्याची पोलिसांना दिली खोटी खबर!
...म्हणून ‘त्याने’ आरडीएक्स असल्याची पोलिसांना दिली खोटी खबर!

ठाण्यातून घोडबंदर रोड येथून निघालेल्या टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे टँकर चालक आणि दुचाकी चालकाचे भांडण झाले होते. या भांडणामुळे टँकर चालकाला अद्दल घडविण्यासाठी दुचाकी चालकाने थेट मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करत दोन पाकिस्तानी नागरिक टँकरमधून आरडीएक्सचा साठा घेऊन गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती देत खळबळ उडवून दिली होती. अखेर मुंबई गुन्हे शाखेने या दुरध्वनी करणाऱ्या दुचाकीस्वाराला रविवारी कांजूरमार्ग येथून अटक करून आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

निलेश पांडे (४२) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान पांडेने कबुली दिली की, घोडबंदर रोडवर शुक्रवारी रात्री टँकरचालकासोबत जोरदार वाद झाला होता, टँकर चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे हा वाद झाला होता. “पांडेने टँकरचा फोटो काढून काही किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला, परंतु चालकाने टँकर थांबवला नाही,” असे गुन्हे शाखेतील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “रागाच्या भरात, पांडेने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असताना मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि दोन पाकिस्तानी नागरिक केए-१९-एडी-८५७१ क्रमांकाच्या एका पांढऱ्या रंगांच्या टँकरमधून आरडीएक्स घेऊन जात असल्याची माहिती दिली. हा कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ गोव्यातील पोलिसांना सतर्क केले. राज्यभरातील पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आणि कॉल करणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Jayant Savarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड)

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी असे म्हटले की, “टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही गोवा महामार्गावर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी वाढवली आहे. रविवारी दुपारी १.१५ च्या सुमारास संबंधित टँकर संगमेश्वर तालुक्यात अडवण्यात आला. पडताळणी केली असता, टँकरमध्ये प्लॅस्टिकायझर नावाचे रसायन गुजरातहून गोव्यात एका टँकरमधून घेऊन निघाले होते असे पोलिसांना आढळून आले. टँकर चालकाची चौकशी करण्यात आली आणि काहीही संशयास्पद आढळून आले नाही अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने कॉल करणाऱ्या निलेश पांडेचा मोबाईल क्रमांकाच्या आधारे कांजूरमार्ग येथे शोध घेऊन त्याला रविवारी दुपारी अटक करण्यात आली असून त्याचा ताबा आझाद मैदान पोलिसांकडे देण्यात आला आहे. अधिक तपासात निलेश पांडे विरुद्ध कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात अपहरण, हल्ला करणे आणि घरफोडीचे चार गुन्हे दाखल असल्याचे तपासात पोलिसांना आढळून आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.