-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan कल्याणमध्ये केडीएमसी मुख्यालयालगत असलेल्या सुभाष मैदान परिसरात एका १४ वर्षीय विद्यार्थीनीसोबत गैरवर्तनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त शाळेतील कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या विद्यार्थीनीसोबत हा प्रकार घडला. बाजारपेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी भावेश अहिर या २२ वर्षीय तरूणाला अवघ्या एक तासांच्या आत बेड्या ठोकून गजाआड केले आहे. (Kalyan)
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थीनी सुभाष मैदानातील उद्यान परिसरात फिरत असताना तेथे असलेल्या एका तरूणाने तिला कपडे आणि मोबाईल घेऊन देतो असे अमिष दाखवून तिचा हात पकडला आणि तिला ओढण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे त्यावेळी मैदान परिसरात वर्दळ कमी होती. केडीएमसी मुख्यालय आणि सुभाष मैदान यांची भिंत संयुक्त असल्याने ही घटना मुख्यालयाच्या लगतच घडली. (Kalyan)
(हेही वाचा – Crime : आयुष्मान भारत-महात्मा ज्योतिराव फुले योजनेत १.७९ कोटींचा बोगस आरोग्य विमा घोटाळा उघड)
पिडीत विद्यार्थीनी सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्याची मुलगी आहे. घडलेल्या प्रकारानंतर तिने घरी जाऊन माहिती दिली आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन आरोपी भावेश अहिर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (Kalyan)
गेल्या काही दिवसांपासून सुभाष मैदानातील उद्यानात सायंकाळी पाचनंतर गैरकृत्य करणाऱ्यांचा वावर वाढल्याची तक्रार स्थानिक रहिवासी आणि काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसीकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

