मुंबईनंतर ठाण्यातही भाजपाकडून शिवसेनेची पोलखोल

पाच वर्षांतील भ्रष्टाचारावर काळी पुस्तिका, प्रदर्शनही भरविणार

79

मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्यातही भाजपाकडून सत्ताधारी शिवसेनेने पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विविध ५० प्रकरणांवर काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार असून, शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभांसह प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. भाजपाच्या ठाणे कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली.

(हेही वाचा- ‘परशुराम घाट’ रोज ६ तास बंद राहणार! जाणून घ्या ‘कोकणात’ जायचे पर्यायी मार्ग…)

थीम पार्क, बीएसयूपीसह तब्बल ५० प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार

ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कोविड आपत्तीसह पाच वर्षांच्या काळात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. नागरी सुविधांच्या कामांसह बॉलिवूड पार्क, थीम पार्क, बीएसयूपीसह तब्बल ५० प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे देत काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर व्हीडीओ क्लिप व छायाचित्रे तयार करून प्रदर्शन भरविले जाईल. शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन भाजपाकडून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी दिली. पोलखोल करण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे डावखरे यांनी सांगितले. तर ठाणे महापालिकेत आढळलेल्या भ्रष्टाचाराचे अनुभव नागरिकांनी भाजपा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. या पत्रकार परिषदेला माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, मनोहर डुंबरे, शहर सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुखदरे यांचीही उपस्थिती होती.

सोमय्या, डावखरेंकडून हिरेन कुटुंबियाची भेट

माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्याकडून आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली. मनसुख हे आरोपी नसून, पीडित असल्याचे `एनआयए’ने स्पष्ट केले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर हिरेन कुटुंबियांना दिलासा मिळाला, असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरेन कुटुंबियांची माफी मागावी, अशी मागणीही केली. प्रदीप शर्मा व सचिन वाझे यांची पुन्हा पोलिस दलात नियुक्ती कशी झाली, त्यामागील सुत्रधाराचा तपास करण्यासाठी पुढील आठवड्यात `एनआयए’ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, असे सोमय्या यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.