राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शुक्रवारी आंदोलनकारी एसटी कर्मचा-यांनी आक्रमक आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी पवारांच्या घरावर दगडफेक सुद्धा केली. या घटनेचा अनेक राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. याबाबत शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः फडणवीस म्हणतात, आंदोलनकारी एसटी कर्मचा-यांचं चुकलंच)
काय म्हणाले पवार?
आज जे काही घडलं याविषयी फार काही वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. नेता शहाणा नसला तर त्याचा कार्यकर्त्यांवर काय परिणाम होतो, हे आज पहायला मिळालं. आम्ही एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच मतभेद आणि संघर्ष होत असतात. पण अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः पवारांच्या घरासमोरील आंदोलन, गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी घेतले ताब्यात)
आमचे घनिष्ठ संबंध
गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचा-यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न होत आहे, तो शोभनीय नाही. एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घनिष्ठ संबंध आहेत. गेली 40-50 वर्ष एसटीचं एकही अधिवेशन माझ्याकडून चुकलेलं नाही. आम्ही नेहमीच एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण यावेळी कर्मचा-यांना चुकीचा रस्ता दाखवण्यात आला आहे आणि त्याचेच परिणाम आज दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले.
(हेही वाचाः पवारांच्या बंगल्यावर नेमके धडकले कोण? आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांना थांगपत्ता नाहीच)
नैराश्य बाहेर काढण्यासाठी…
कारण नसताना काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी संपामुळे नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आलं. दुर्दैवानं काही व्यक्तींना आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते, तेच नेतृत्व आत्महत्येसारख्या गोष्टीला जबाबदार असल्याचा आरोपही त्यांना यावेळी केला आहे. संपामुळे जे नैराश्य आलं, ते कुठेतरी काढलं पाहिजे, म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले.
(हेही वाचाः एसटी संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ)
Join Our WhatsApp Community