Crime : चोरट्यांची नजर महावितरणच्या तांब्याच्या तारांवर; सात ठिकाणी ट्रान्सफॉर्मर फोडून लाखो रुपयांच्या तारा लंपास

17
Crime
Crime
  • कल्याण : प्रतिनिधी

Crime : एकीकडे गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणेश भक्तांसह शासन/प्रशासन व्यस्त असतानाच दुसरीकडे मात्र चोरट्यांनी महावितरणच्या रोहित्रांवर डोळा ठेवला असून बदलापूर विभागात सात ठिकाणी रोहित्र फोडून लाखो रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महावितरणकडून रितसर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Iran US Talks 2026 : अमेरिकेबरोबर चर्चेसाठी इराणने समोर ठेवल्या ७ अठी, होर्मूझ तोपर्यंत बंद ठेवण्याचा इशारा )

या संदर्भात महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ९ ते १७ सप्टेंबर या कालावधीत या चोरीच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत सरळगाव शाखेचे कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असलेले रविंद्र घुडे हे वीज वाहिनी तपासणीसाठी बाहेर पडले असता त्यांना शिवळे आंबोरे शिवारात २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उघड्या अवस्थेत आढळून आले. तसेच ब्राह्मणगाव येथील स्टोन क्रशरला वीज पुरवठा करणारे रोहित्र देखील उघडे पडलेले आढळून आले. दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी अगोदर रोहित्रातील तेल जमिनीवर टाकून आतील अनुक्रमे १९० आणि १३५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा लंपास केल्या. या दोन घटनांमध्ये महावितरणचे २५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरी घटना १७ तारखेच्या दरम्यान घडली असून चोरट्यांनी मौजे किशोर, चिखली, नारायणगाव, शिरवली आणि नढई या दुर्गम भागात महावितरणच्या रोहित्रांवर हात साफ केला आहे. चोरट्यांनी तब्बल ८०० लिटर तेल जमिनीवर टाकून आतील तांब्याच्या तारा लंपास केल्या. या पाच ठिकाणी झालेल्या चोरीमुळे महावितरण कंपनीचे १ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही प्रकरणी मुरबाड ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता राधेश्याम जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान मुरबाड आणि बदलापूर येथील वीज ग्राहकांना महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे की रोहित्राजवळ संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून वीज पुरवठा खंडित होणार नाही आणि मोठ्या नुकसानीपासून बचाव होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.