
Swatantrya Veer Savarkar: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृती, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा ७२वा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा आज, मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवाडिया येथील एकता नगरमध्ये नर्मदेच्या काठी साजरा झाला. यावेळी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी अभिनेते, दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेते रणदीप हुड्डा यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे केवळ दिग्दर्शनच केले नाही, तर यात मुख्य भूमिकाही साकारली असून सहलेखन आणि सहनिर्मितीची धुराही सांभाळली आहे. पुरस्कारादरम्यान हुड्डा यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच ”भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारकांची भूमिका अधोरेखित करण्याचा उद्देश हा चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारण्यामागे होता. ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ हा पुरस्कार संपूर्ण चित्रपटाच्या टिमसाठी प्रतिष्ठेचा सन्मान आहे.”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC Smart Card नोंदणीसाठी आता नवा पर्याय उपलब्ध
स्वातंत्र्यवीर सावरकर सशस्त्र क्रांतिचे ‘इनफ्लुएन्झऱ’
यावेळी ”हा चित्रपट फक्त देशासाठीच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणं हे आजच्या काळासाठी किती आवश्यक होतं”, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणं अत्यंत आवश्यक होतं, कारण बहुतांश लोकांची अशी धारणा आहे की, देशाला स्वातंत्र्य फक्त अहिंसेने मिळालं आहे, पण प्रत्यक्षात हे खरं नाही. स्वातंत्र्य मिळवण्याकरिता आपल्या क्रांतिकारांनी सशस्त्र क्रांती केली. सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, लोकमान्य टिळक… अशा अनेक क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकजुटीने लढा दिला आहे, मात्र हा खरा इतिहास प्रेक्षकांसमोर येणं गरजेचं आहे. सशस्त्र क्रांती ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुख्य बाब असून या क्रांतीचे ‘इन्फ्लुएन्झर’ स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यांच्या अनेक ग्रंथांतून याविषयी माहिती मिळते.”
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण…
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मु.पो. बोंबीलवाडी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावला आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार जाहीर झाला असून ‘घरत गणपती’ चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा सन्मान मिळाला आहे, तर ‘मराठी-इंग्रजी पट ‘भंगार’ने सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म पुरस्कार’ जाहीर झाला असून अभिनेत्री यामी गौतमला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कलाविश्वाची मान अभिमानाने उंचावली आहे.
अनंत नाग यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
१९५४ पासून सुरू असलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गेल्या ७ दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलता, तांत्रिक दर्जा आणि भाषिक वैविध्याचा गौरव केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने ज्य़ेष्ठ अभिनेते अनंत नाग यांना यावेळी गौरवण्यात आले. त्यांनी सत्तरच्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘संकल्प” या कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दिची सुरुवात केली. ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. ६ भारतीय भाषांतील ३००हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘मालगुडी डेज’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले. २०२५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.
हेही पहा –

