Asian Games 2026 : भारताची सुवर्णझेप! शेफाली-मंधानाच्या तुफान खेळीसह श्रीलंकेवर दणदणीत विजय

सलामीला आलेल्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला

18
Asian Games 2026
भारतीय संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय (फोटो सौजन्य- X)

Asian Games 2026 : भारतीय महिला क्रिकेट संघाने Asian Games 2026 मध्ये पुन्हा एकदा सुवर्णकामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने तब्बल 147 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेटचे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 3 गडी गमावून 216 धावा उभारल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 67 धावांत गारद झाला.

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. दोघींनीही पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. शेफालीने केवळ 29 चेंडूंत 48 धावा केल्या. तिच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. शेफाली बाद झाल्यानंतरही भारताच्या धावांचा वेग कमी झाला नाही. (Asian Games 2026)

स्मृती मंधानाची 79 धावांची तुफानी खेळी

स्मृती मंधानाने अंतिम सामन्यात पुन्हा एकदा आपली आक्रमक फलंदाजी दाखवून दिली. तिने 45 चेंडूंत 79 धावा ठोकल्या. या खेळीत 5 चौकार आणि 7 षटकार होते.

या खेळीदरम्यान मंधानाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करणारी पहिली महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. मंधानाच्या या खेळीमुळे भारताच्या डावाला मोठी ताकद मिळाली. (Asian Games 2026)

रिचा घोषचा विजयी वार

मंधाना बाद झाल्यानंतर रिचा घोषने डावाची सूत्रे हातात घेतली. तिने श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत अवघ्या 22 चेंडूंत नाबाद 49 धावा केल्या.

रिचाच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने 20 षटकांत 216/3 अशी भक्कम धावसंख्या उभारली. ही एशियन गेम्समधील महिला क्रिकेटमधील विक्रमी धावसंख्या ठरली. भारताने श्रीलंकेसमोर सुवर्णपदकासाठी 217 धावांचे लक्ष्य ठेवले. (Asian Games 2026)

भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अडचणीत आणले.

शफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजीची कंबर मोडली. अवघ्या काही षटकांत श्रीलंकेने महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आणि मोठ्या धावसंख्येपासून संघ दूर गेला. अखेर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 67 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने तब्बल 147 धावांनी अंतिम सामना जिंकला. (Asian Games 2026)

भारताच्या पारड्यात पहिले सुवर्णपदक

या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने 2023 नंतर 2026 मध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. 2023 च्या Hangzhou Asian Gamesमध्येही भारताने श्रीलंकेला अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्णपदक पटकावले होते. यावेळी पुन्हा अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आणि निकाल पुन्हा भारताच्या बाजूने लागला. विशेष म्हणजे, एशियन गेम्समध्ये भारताच्या पदक खात्यातील हे पहिले सुवर्णपदक ठरले.  (Asian Games 2026)

भारताच्या 216/3 या धावसंख्येमुळे महिला क्रिकेटमधील Asian Gamesच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला. मंधाना आणि शफालीच्या 99 धावांच्या सलामीच्या भागीदारीने डावाला वेग दिला, तर रिचाच्या आक्रमक फिनिशिंगमुळे भारताने 200 धावांचा टप्पाही सहज ओलांडला.

एकीकडे भारताला सुवर्णपदक मिळाले, तर दुसरीकडे स्मृती मंधानाने 11,000 आंतरराष्ट्रीय धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटसाठी हा अंतिम सामना अनेक विक्रम आणि ऐतिहासिक कामगिरी करणारा ठरला. (Asian Games 2026)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.