Eknath Shinde Escort Officer Death : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात एस्कॉर्ट अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) विजय शंकर सांगडे यांचे वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले. कोर्ट नाका येथील शासकीय विश्रामगृहात कर्तव्यावर असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे ठाणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय सांगडे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी ठाण्यातील कोर्ट नाका येथील शासकीय विश्रामगृहात ड्युटीवर हजर झाले होते. कर्तव्य बजावत असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि त्यांना चक्कर आली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
तीन वर्षांपासून शिंदेंच्या ताफ्यात सेवा
विजय सांगडे हे कल्याण नियंत्रण कक्षात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात एस्कॉर्ट अधिकारी म्हणून सेवा बजावत होते. कर्तव्यावर असताना अचानक त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. विजय सांगडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रहिवासी होते. सध्या ते कुटुंबासह डोंबिवलीतील पलावा सिटी परिसरात राहत होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शासकीय इतमामात अखेरचा निरोप
घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांचे पार्थिव ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पोलीस दलाच्या उपस्थितीत त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलीस तुकडीने मानवंदना देत आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली.
शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर विजय सांगडे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी जुन्नर येथे अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे पोलीस दलासह कुटुंबीय आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
Join Our WhatsApp Community

