-
प्रतिनिधी
Palestine वांद्रे पश्चिमेकडील ऑटर्स क्लबजवळ पॅलेस्टाईनचे झेंडे, फलक लावून पतंग उडवल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर समोर आल्यानंतर, वांद्रे पोलिसांनी ‘इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन’ (IPSP) या संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांच्या घरांची झडती घेतली आहे. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी आयोजकांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजमाध्यमांवरील व्हिडिओंवरून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. संबंधित व्यक्ती चौकशीत सहकार्य करत नसल्याने वाकोला येथील त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान पुस्तके व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Palestine)
दुसऱ्या बाजूला, आयोजकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान गाझामधील मुलांप्रती सहसंवेदना व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ‘ग्लोबल गाझा काईट वीकेंड’ या मोहिमेचा हा एक भाग होता, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. विनावॉरंट छापेमारीचा कार्यकर्त्यांचा आरोप आयपीएसपीने मुंबई पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा सर्च वॉरंट नसताना पोलिसांनी कार्यकर्ती हर्षदा बोराडे यांच्या घरावर १८ सप्टेंबर रोजी छापा टाकल्याचा आरोप संघटनेने केला आहे. (Palestine)
(हेही वाचा – Davis Cup 2026 : डेव्हिस चषकात भारताचा प्रवास संपला; कोरियाकडून १-३ ने पराभव)
हर्षदा बोराडे यांनी सांगितले, “१५ सप्टेंबर रोजी एका खासगी इमारतीच्या गच्चीवर केवळ ५ ते ६ जण एकत्र आले होते. आंतरराष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून आम्ही पॅलेस्टाईनचे झेंडे लावून पतंग उडवले. मात्र, पोलिसांनी घरात घुसून उपस्थित मित्रांना बेड्या ठोकल्या, पुस्तके, वैयक्तिक डायऱ्या तपासल्या आणि आमचे फोनही ताब्यात घेतले.” तपासण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्यावरील पुस्तकांचाही समावेश होता, असा दावा संघटनेने केला आहे. ही झडती संध्याकाळी ५.३० ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू होती. (Palestine)
नागरी हक्क आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी आयपीएसपीने केली आहे. दरम्यान, सर्व कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून सुरू असून कोणालाही बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेले नाही, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. (Palestine)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

