Mumbai Crime : सर्वसामान्यांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. भांडुप परिसरात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या दोन वेगवेगळे दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन भोंदू डॉक्टरांवर गुन्हे शाखा कक्ष ७ आणि महापालिका आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी केवळ पाचवी पास तर दुसरा बारावी पास असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ वॉर्डच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली देवेन राठोड यांच्या तक्रारीवरून भांडुप पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध वैद्यकीय व्यवसायी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मोहम्मद अन्वर मोहम्मद अस्लम (वय ३४), मो. नबी हुसेन मो. फरीद शेख (रा. मुंब्रा) आणि इमरान अब्दुल जब्बार खान (वय ४०, रा. सोनापूर, भांडुप) अशी गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत.
(हेही वाचा – Lalbaugcha Raja च्या व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक, भाविकांकडून उकळले पैसे; काय आहे प्रकरण? )
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची कारवाई
भांडुप पश्चिमेकडील एलबीएस मार्गावरील ड्रीम मॉलसमोरील ‘संतोष हेल्थ क्लिनिक’ आणि मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील ‘विनायक हेल्थ क्लिनिक’ या दोन ठिकाणी कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा नोंदणी नसताना बेकायदेशीररीत्या दवाखाने सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पालिका आरोग्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस निरीक्षक सरफरे, सपोनि शेलार यांच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला.
दुसऱ्याच्या नावाने क्लिनिक, औषधांचा मोठा साठा जप्त
छाप्यादरम्यान ड्रीम मॉलसमोरील ‘संतोष हेल्थ क्लिनिक’मध्ये शेख मोहम्मद अन्वर आणि मो. नबी हुसेन हे दोघे रुग्ण तपासताना आढळले. त्यांच्याकडे वैद्यकीय पदवीबाबत विचारणा केली असता, त्यांनी डॉ. रिझवानुल्लाह नबीदाद खान यांच्या नावाचे ‘कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’चे प्रमाणपत्र सादर केले. चौकशीत हे प्रमाणपत्र बनावट पद्धतीने वापरत असल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्षात शेख मोहम्मद हा १२ वी पर्यंत शिकलेला असून मो. नबी हुसेन हा केवळ पाचवी पास असल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर पथकाने मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील एका गॅरेजच्या पोटमाळ्यावर सुरू असलेल्या ‘विनायक हेल्थ क्लिनिक’वर छापा टाकला. तिथे इमरान अब्दुल जब्बार खान हा स्वतःला ‘गुप्तरोग तज्ज्ञ’ भासवून रुग्णांवर उपचार करत होता. त्यानेही डॉ. सिद्दीकी फहीम अहमद यांच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र स्वतःचे असल्याचे सांगून क्लिनिक सुरू ठेवल्याचे उघड झाले. तपासणीदरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने इमरान खान याला पोलिसांनी तत्काळ मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात व नंतर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दोन्ही क्लिनिकमधून पोलिसांनी विविध प्रकारच्या गोळ्या, पावडरी, सिरप, रिकामे डबे, जाहिरातींचे बॅनर्स आणि बनावट प्रमाणपत्रांच्या फ्रेम्स असा मोठा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे. या कारवाईचे पोलिसांकडून व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.
कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसताना रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१’ च्या कलम ३३ आणि ३६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुर्वे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

