Lalbaug : लालबाग-परळ परिसरात गणेशदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर एका शीतपेयाच्या स्टॉलमधील उघड्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह एका ३३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात स्टॉल चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळच्या उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी असलेल्या संगिता घनश्याम यादव (वय ३५) या थायरॉईडच्या उपचारासाठी गेल्या काही महिन्यांपासून मानखुर्द येथे वडिलांकडे वास्तव्यास होत्या. त्यांची ८ वर्षांची लहान मुलगी रागिणी हिला मुंबईतील गणेशोत्सव पाहण्याची विशेष आवड असल्याने, संपूर्ण कुटुंब शनिवारी मध्यरात्री मानखुर्दहून लालबागच्या दिशेने दर्शनासाठी निघाले होते.
रविवारी पहाटे दोनच्या सुमारास हे कुटुंब दत्ताराम लाड मार्गावरील आस्था हॉस्पिटलजवळ रस्त्यावरून जात असताना, तेथील एका पेप्सी कोला (शीतपेय) स्टॉलजवळ थांबले. त्याच वेळी स्टॉलमधून बाहेर सोडलेल्या मोकळ्या इलेक्ट्रीक वायरला रागिणीचा पाय लागला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने ती जागीच कोसळली. तिच्यासोबत असलेल्या इतर भाविकांनाही विजेचा तीव्र झटका बसला आणि ते बेशुद्ध पडले. उपस्थित नागरिकांनी तातडीने स्टॉलचा वीजपुरवठा खंडित केला आणि जखमींना रुग्णालयात हलवले.
(हेही वाचा – PM मोदींची मिमिक्री भोवली? Pulkit Maniचा नोएडातील शो रद्द! पोस्ट करत म्हणाला, “अब अंडरग्राऊंड होने…” )
उपचारापूर्वीच बालिकेचा मृत्यू, महिलेनेही प्राण गमावले
रागिणीला भायखळा येथील मसिना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला दाखलपूर्व मयत घोषित केले. तर सुजाता बलराज थोडेटी (वय ३३, रा. धारावी) या महिलेला गंभीर अवस्थेत परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
या दुर्घटनेत किरण अकबर नाईक (वय १९, रा. कर्जत), तन्वी नरेश हांडे (वय १९, रा. कर्जत), साहिल संदिप तरे (वय १९, रा. भिवंडी) आणि रूही शैलेश सिंग (वय १२, रा. सांताक्रुझ) हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शीतपेयाच्या स्टॉलमध्ये निष्काळजीपणे विजेच्या तारा मोकळ्या सोडून भाविकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी, तक्रारदार संगिता यादव यांच्या फिर्यादीवरून स्टॉल चालक कमल शेटी याच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि १२५(b) (जीवितास धोका निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

