Lalbaugcha Raja : ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असतानाच, भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन व्हीआयपी चरणस्पर्श दर्शनाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या एका भामट्याला भाविकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार इक्बाल आसमोहम्मद मन्सुरी (वय २०, रा. खार रोड, वांद्रे) हे एका सेवाभावी संस्थेमार्फत लालबागचा राजा परिसरात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे काम करतात. शनिवार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांचे मित्र दीपक दुशांत, मंथन शिंदे आणि ऋषिकेश पवार हे लालबागच्या राजाचे चरणस्पर्श दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन रांग मोठी असल्याने लवकरात लवकर चरणस्पर्श कसा होईल, या विवंचनेत ते असतानाच मॅग्नम टॉवर गेटजवळ त्यांना प्रणव सुरेशकुमार यादव (वय १९, रा. बेस्ट स्टाफ क्वार्टर्स, परेल) हा तरुण भेटला.
त्याने स्वतःची ओळख पटवून, “मी तुम्हाला राजाचे थेट चरणस्पर्श दर्शन घडवून आणतो, मात्र त्यासाठी चार जणांचे प्रतिव्यक्ती ८५० रुपये याप्रमाणे एकूण ३,४०० रुपये द्यावे लागतील,” असे सांगितले. भाविकांनी त्यावर विश्वास ठेवून त्याला ८०० रुपये ऑनलाईन स्कॅनरद्वारे पाठवले, तर उर्वरित २,६०० रुपये रोख स्वरूपात दिले.
(हेही वाचा – Asian Games 2026 : भारतीय महिला संघ बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत; शेफाली वर्माची शतकी खेळी )
पैसे घेतल्यानंतर आरोपीने “मी दर्शनाची व्यवस्था (अरेंजमेंट) करून येतो,” असे सांगून तिथून काढता पाय घेतला. मात्र, दोन तास उलटूनही तो परत न आल्याने भाविकांच्या लक्षात फसवणूक झाल्याचे आले.
भाविकांनी परिसरात शोध घेतला असता आरोपी प्रणव यादव त्याच भागात मिळून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता, “माझी कोणतीही पासेसची सोय अथवा ओळख नाही; मी केवळ पैशांसाठी खोटे बोललो,” असे सांगत त्याने पैसे परत देण्यासही नकार दिला. अखेर भाविकांनी त्याला पकडून काळाचौकी पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी प्रणव यादव विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४) (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक विशाल जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राजाच्या दर्शनासाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीच्या अथवा एजंटच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

