-
डॉ. पल्लवी बिप्टे
Digital Detox For Kids : शाळा सुटली की दप्तर घरी ठेवले की लगेचच मित्रांसोबत खेळायला जाणे, संध्याकाळ झाली की आई-बाबांनी “चला घरी या आता” अशी हाक मारणे आणि खेळ संपवून मगच घरी परतणे, हे काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलांच्या दिवसाचा एक अविभाज्य भाग झाला होता. आता मात्र अनेक मुलांच्या हातातल्या बॅट-बॉल आणि सायकलची जागा स्मार्टफोन , रिमोट आणि टॅबलेट्सने घेतलेली दिसते. मैदानावर मित्रांसोबत खेळण्याऐवजी मोबाईल गेममध्येच स्पर्धा रंगताना दिसते. त्यामुळे मुलांना फक्त मोबाईलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्यांना मैदानावर खेळण्याची संधी आणि त्यातला आनंद पुन्हा अनुभवता येईल, असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनीही वेळ मिळेल तेव्हा मुलांसोबत मैदानात उतरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शाळा आणि क्लासचा अभ्यास, मोबाईल, टीव्ही आणि इतर उपक्रमांमध्ये मुलांचा पूर्ण दिवस व्यस्त होतो. मोकळा वेळ मिळाला की मोबाईलवर गेम खेळणे किंवा व्हिडीओ पाहणे पसंत करतात. त्यातच अनेक घरांजवळ सुरक्षित खेळाची जागा उपलब्ध नसल्याने मुलांना मैदानावर पाठवणेही पालकांसाठी आव्हानात्मक ठरते.
मुलांच्या वाढीसाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित शारीरिक हालचालही आवश्यक आहे. धावणे, सायकलिंग, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, पोहणे किंवा साधे मैदानी खेळ मुलांना सक्रिय ठेवण्यास मदत करतात.
मैदानी खेळांचा फायदा केवळ शारीरिक हालचालीपुरता मर्यादित राहत नाही. खेळताना मुलांना इतर मुलांसोबत मिसळण्याची, नियम पाळण्याची आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याची संधी मिळते. टिममध्ये खेळताना त्या टिमचे नेतृत्व करणे, सहकाऱ्यांना मदत करणे, जिंकण्याचा आनंद घेणे आणि पराभव स्वीकारून पुन्हा प्रयत्न करणे यांसारखी कौशल्येही विकसित होतात.
विटीदांडू, लगोरी, लपाछपी यांसारख्या पारंपरिक खेळांमध्ये मुलं धावत, उड्या मारत आणि एकमेकांशी संवाद साधत असत. आजच्या डिजिटल काळात अशाच मैदानी खेळांना पुन्हा दैनंदिन आयुष्यात स्थान देण्याची गरज आहे.
(हेही वाचा – IBPSमार्फत बँका आणि पोस्टात ३७,४६३ पदांची भरती, केवळ दोन दिवस शिल्लक; ऑनलाइन अर्ज कसा कराल? )
पालकांनीही मुलांसोबत मैदानात उतरावे
तज्ज्ञांच्या मते, पूर्वी मुलं शाळा सुटल्यानंतर लगेच मैदानावर खेळायला जात असत. त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायामही होत असे आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधीही मिळत असे. आज मोबाईलवर गेम खेळण्यात मुलांचा कल वाढला असला, तरी पालकांनी वेळ मिळेल तेव्हा मुलांसोबत मैदानात उतरून खेळायला हवे. दररोज अर्धा ते एक तास सायकलिंग, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, पोहणे किंवा धावण्यासारख्या उपक्रमांसाठी दिला तरी मुलांच्या शारीरिक हालचालींना चालना मिळू शकते.
पालकांनी मुलांना केवळ “मोबाईल बंद कर आणि खेळायला जा” असे सांगण्यापेक्षा स्वतः त्यांच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी पार्कमध्ये जाणे, सायकल चालवणे, बॉल खेळणे किंवा सोसायटीच्या मैदानात मुलांसोबत काही वेळ घालवणे हा त्यासाठी सोपा मार्ग ठरू शकतो.
मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेण्यापेक्षा त्यांच्या हातात बॉल, बॅट, सायकल किंवा खेळाचे साहित्य द्या आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबतच काही वेळ मैदानात घालवा. कारण खेळातून घडणारे बालपण केवळ शरीराला नाही, तर मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासालाही चालना देतात.
(लेखिका मुंबईतील झायनोव्हा शाल्बी रूग्णालयात नेत्रतज्ज्ञ विशारद आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

