-
ईश्वरी मुरुडकर
Impact of Smartphones on Children ‘चल पटकन जेवून घे, नाहीतर मोबाईल देणार नाही!’ किंवा ‘बाळ रडतंय? द्या हातात मोबाईल.’ आजकाल घरोघरी हेच चित्र पाहायला मिळतं. ज्या वयात हातामध्ये रंगीबेरंगी खेळणी, पुस्तके आणि मैदानातील माती असायला हवी होती, त्या वयात आजच्या चिमुकल्यांच्या हातात ‘स्मार्टफोन’ दिसतोय. डिजिटल क्रांतीच्या या युगात तंत्रज्ञान सोयीचं ठरलं असलं, तरी त्याने आपल्या मुलांचे बालपणातील सर्वात सुंदर दिवस मात्र हिरावून घेतले आहे. कित्येक मुलं मोबाईलच्या आहारी जात आहेत. (Impact of Smartphones on Children)
आज प्रत्येक व्यक्ती दिवसभरात सरासरी जवळपास अडीच तास सोशल मिडियाचा वापर करतो, असे तज्ज्ञ सांगतात. लहानांपासून थोरांपर्यंत कोणत्याही गॅझेटशिवाय आपलं जगणं कठीण झालं आहे. विशेषत: आजची लहान मुलं या स्मार्ट फोनच्या खूपच आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘पबजी’ किंवा ‘फ्री फायर’सारख्या आभासी गेमिंगमध्ये मुले तासन् तास एकाच जागी बसून स्क्रीनकडे पाहत असतात.
पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली की गल्लीबोळात मुलांचा कलकलाट ऐकू यायचा. लपंडाव, विटीदांडू, पकडापकडी, सुरपारंब्या यांसारखे मैदानी खेळ खेळताना होणारा शारीरिक व्यायाम मुलांना आरोग्यदायी बनवायचा. पण आता मैदानातील ही गर्दी स्क्रीनवर जमा झाली आहे. मुले तासन् तास एकाच जागी बसून स्क्रीनकडे पाहत असतात. यामुळे लहान वयात मुलांना चष्मे लागणे, लठ्ठपणा, मानदुखी आणि निद्रानाश यांसारख्या समस्या जडत आहेत. शिवाय सोशल मीडिया आणि गेम्सच्या प्रभावामुळे मुलांमध्ये चिडचिडपणा, एकाकीपणा आणि आक्रमकता वाढली आहे. समोरासमोर बसून संवाद साधण्याची त्यांची क्षमता कमी होत चालली आहे. स्क्रीनवर सतत तयार कंटेंट पाहिल्यामुळे मुलांची स्वतःची कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची क्षमता क्षीण होत आहे. (Impact of Smartphones on Children)
(हेही वाचा – Ganeshotsav 2026 : अंजीर-मखाण्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; अमरावतीत विशेष आकर्षण)
मुले ही अनुकरणप्रिय असतात; आपण हातात मोबाईल घेऊन त्यांना ‘मोबाईल पाहू नकोस’ असं सांगू शकत नाही. त्यामुळे आधी पालकांनी स्वतःचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करून मुलांना वेळ द्यायाला हवा. त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करणे, वाचनाची आवड निर्माण करणे आणि निसर्गाच्या सानिध्यात नेणे, विविध छंदांची जोपासना करायला शिकवणे गरजेचे आहे. अर्थात मुलांना डिजिटल मोहाच्या आभासी जगातून बाहेर काढून त्यांना आनंदी बालपणाचा अनुभव देणे हे आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. पुस्तक, चेंडू, रंगांची पेटी, सायकल आणि मित्रांचा सहवास यांनाही त्यांच्या आयुष्यात तितकेच स्थान मिळायला हवे. मोकळा वेळ म्हणजे स्क्रीनटाइम नव्हे, मुलांच्या विकासासाठी समोर स्क्रीन नसलेला मोकळा वेळही महत्त्वाचा असतो. त्या वेळेत मुलांनी स्वतः नवनवीन खेळ शोधावेत, नवीन कल्पना मांडाव्यात, चित्रे काढावीत, पुस्तके वाचवी किंवा मित्रांसोबत काहीतरी नवीन गोष्टी शिकाव्यात. (Impact of Smartphones on Children)
मुलांच्या शारीरिक हालचालींना पालकांनी महत्त्व द्यावे. त्याचप्रमाणे त्यांचं मानसिक आरोग्यही उत्तम राहायला हवं. तसंच बुद्धिचा विकास होणारे खेळही त्यांनी खेळायला हवेत. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याने सक्रिय वेळ कमी होतो. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सर्वांगिण उत्कर्षासाठी जे मोबाईलच्या स्क्रीनवर बघणे आवश्यक आहे, तेच पाहण्यास, वाचण्यास मुलांकडे आग्रह धरावा. यामुळे मुलांचा वेळ अनावश्यकरित्या वाया जाणार नाही. याकरिता पालकांनी मुलांना त्यांच्या दिनचर्येचे नियोजन करून द्यावे. मोबाईलच्या पडद्यावरचे जग आकर्षक आहे; पण ते खऱ्या जगाची जागा घेऊ शकत नाही. मुलांचे बालपण हे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ आणि पुन्हा न मिळणारे पर्व आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना बालपण गमावले जाणार नाही, याची जबाबदारी पालक, शाळा आणि समाज या सर्वांची आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. (Impact of Smartphones on Children)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

