Crime : मनी लाँड्रिंग व ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला १४ लाखांचा गंडा

15
Crime
Crime

Crime : मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याची आणि ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून विक्रोळी येथील एका ६१ वर्षीय निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची १४ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार (वय ६१, रा. टागोर नगर, विक्रोळी पूर्व) हे केंद्रिय मत्स्य शिक्षण संस्थेतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, १० सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगून तो कॉल मुंबई सायबर क्राईम ब्रँच, बीकेसी येथे ट्रान्सफर करत असल्याचे भासवले.

(हेही वाचा – IIT Bombay मध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल )

त्यानंतर समोरून बोलणाऱ्या ‘रितेश कुमार’ नावाच्या व्यक्तीने आपण सायबर शाखेतून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या नरेश गोयल याच्या घरी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या डायरीमध्ये यांच्या नावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या नोंदी सापडल्याचा खोटा दावा आरोपीने केला. विश्वास बसावा म्हणून आरोपीने व्हॉट्सअॅपवर इंटरपोल रेड नोटीस, ईडीचे लेटरहेड आणि सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आदेश पाठवून ते नंतर डिलीट केले.

भामट्याने तक्रारदाराला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगून व्हिडिओ कॉल सुरू केला व आपण न्यायालयात बसल्याचे भासवले. तसेच कारवाई व मृत्यूची भीती दाखवून या दांपत्याला कोणालाही काही न सांगता एका बंद खोलीत राहण्यास भाग पाडले.

डिजिटल अरेस्टच्या कारवाईतून सुटका करण्यासाठी आणि खात्याची पडताळणी करण्यासाठी खात्यातील सर्व रक्कम तात्काळ ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. भीतीपोटी तक्रारदाराने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विक्रोळी शाखेत जाऊन आपल्या नावावर असलेल्या चार मुदत ठेवी (FD) मोडून एकूण १४ लाख ४७ रुपये आरोपीने दिलेल्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर आरटीजीएस (RTGS) द्वारे वर्ग केले.

पैसे जमा झाल्यानंतरही आरोपीने आणखी पैशांची मागणी सुरू ठेवल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर हेल्पलाईन ‘१९३०’ वर संपर्क साधून ऑनलाईन तक्रार नोंदवली. यानंतर पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.