Vikhroli मध्ये एलबीएस मार्गावर निष्काळजीपणाचा बळी; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

20
Vikhroli
Vikhroli

Vikhroli : विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्गावर कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड अंगावर कोसळल्याने एका ५४ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वसी हैदर रिझवी (वय ५४) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी कामाच्या ठिकाणचे प्रोजेक्ट डायरेक्टर, मॅनेजर, साईट सुपरवायझर आणि संबंधित कंपनीच्या विरोधात हयगयी व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिमेकडील गोसिया चाळ परिसरात राहणारे वसी हैदर रिझवी हे प्लंबिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने एलबीएस मार्गावरून मुलुंडच्या दिशेने जात होते. ते विक्रोळी पश्चिमेकडील रोझारी इमारतीसमोर आले असता, रस्त्यावरील डिव्हायडरजवळ योग्य ती खबरदारी व उपाययोजना न करता लावलेले एक लोखंडी बॅरिकेड अचानक त्यांच्या चालत्या दुचाकीवर व अंगावर कोसळले. या भीषण अपघातात वसी हैदर यांच्या शरीराला गंभीर मार लागून ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले.

(हेही वाचा – Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा; ओवैसी, चंद्रशेखर आणि मौर्य एकत्र आल्यास समाजवादी पक्षाला फटका बसणार? )

घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी वसी हैदर यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दुपारी १२.३५ वाजता त्यांना मयत घोषित केले.

रस्त्यावर विकासकामांसाठी किंवा इतर कारणांसाठी बॅरिकेडिंग करताना वाहनचालकांच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेणे कंत्राटदार व व्यवस्थापनाचे कर्तव्य असते. मात्र, संबंधितांनी हयगय व बेजबाबदार वर्तन केल्यामुळेच बॅरिकेड पडून हा प्राणघातक अपघात घडल्याचा आरोप मयताचे मुलगे अली रझा रिझवी (वय ३२) यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून कामाशी संबंधित प्रोजेक्ट डायरेक्टर (वय ४५), मॅनेजर (वय ३५), साईट सुपरवायझर (वय ४०) आणि संबंधित कंपनी अशा चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे) व कलम ३(५) (सामूहिक जबाबदारी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी सदानशिव करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.