-
ऋजुता लुकतुके
Indian Cricket Team : भारतीय क्रिकेटमधील दोन अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाच्या आशांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, मात्र दोघांनाही संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने शमी आणि भुवनेश्वर यांनी आता परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याचा विचार करावा, असे मत व्यक्त केले आहे.
भुवनेश्वर कुमारने २०२६च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून प्रभावी कामगिरी केली. विजेत्या संघासाठी त्याने २८ बळी घेतले. याआधीही २०२५च्या मोसमात त्याने १७ बळी घेतले होते. त्यामुळे आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारावर त्याला पुन्हा भारतीय संघात संधी मिळू शकते, अशी चर्चा होती. मात्र निवड समितीने त्याचा विचार केला नाही.
(हेही वाचा – इस्रायलला क्षेपणास्त्र तळांची माहिती पुरवल्याच्या आरोपावरून Iran ने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी )
मोहम्मद शमीची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. तो २०२५नंतर भारतीय संघाकडून खेळलेला नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात त्याने पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १००वा सामना पूर्ण केला. शमीने या टप्प्याला आपल्या कारकिर्दीतील विशेष क्षण म्हटले असून, १०० प्रथम श्रेणी सामने खेळणे हे मोठे स्वप्न असल्याचे सांगितले.
आकाश चोप्राच्या मते, टी-२०च्या दृष्टीने भुवनेश्वरचा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या दृष्टीने शमीचा विचार होऊ शकला असता. मात्र, नव्या खेळाडूंना सातत्याने संधी दिली जात असल्याने निवड समितीची दिशा स्पष्ट होत असल्याचे त्याने नमूद केले. एकदिवसीय संघात औकिब नबीला संधी मिळाली, तर टी-२० संघात मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ३६ वर्षीय भुवनेश्वरने अलीकडेच आपण भारतीय संघात पुनरागमनाची आशा व्यक्त केली होती, मात्र मिळालेल्या संकेतांनंतर परिस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आल्याचे सांगितले होते. आता वेस्ट इंडिज मालिकेसाठीही संधी न मिळाल्याने या दोन्ही अनुभवी गोलंदाजांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र त्यांच्या भविष्यातील निर्णयाबाबत अंतिम भूमिका त्यांनी किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

