-
प्रतिनिधी
Mumbai-Goa Highway कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा महामार्ग अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे. दरवर्षी गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात लाखो मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना याच मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. प्रचंड वाहतूक कोंडी, अर्धवट कामे, जागोजागी पडलेले खड्डे आणि वाढत्या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका बाजूला राज्यात इतर मोठे द्रुतगती मार्ग अल्पावधीत पूर्ण होत असताना, कोकणाला जोडणाऱ्या या मार्गाची रखडपट्टी मात्र संपण्याचे नाव घेत नाही. यामुळे कोकणातील स्थानिक नागरिक, मुंबईवासीय आणि वाहनचालकांमध्ये प्रशासकीय अनास्थेविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. (Mumbai-Goa Highway)
(हेही वाचा – ‘हा’ देश आता अमेरिकेच्या ताब्यात? Donald Trump यांच्या घोषणेनं जगभरात खळबळ; नेमका काय आहे नवा करार?)
या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि आर्थिक जबाबदारी वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये विभागली गेली आहे. पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) करत असून, महाराष्ट्रातील उर्वरित भागाचे काम राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) सोपवण्यात आले आहे. मात्र, जबाबदाऱ्यांच्या या विभागणीमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे कामाचा वेग कायम मंदावलेलाच राहिला आहे. प्रकल्पामध्ये सर्वाधिक खर्चवाढ चिपळूण-रत्नागिरी पट्ट्यातील परशुराम घाट ते आरवली या टप्प्यात नोंदवली गेली असून, येथे मूळ मंजूर खर्च ९८३ कोटी रुपयांवरून तब्बल १२६ टक्क्यांनी वाढून २,२२६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (Mumbai-Goa Highway)
(हेही वाचा – Weather Update : राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता)
दरम्यान, ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन’चे माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून मिळवलेल्या माहिती अधिकाराच्या (RTI) अधिकृत आकडेवारीतून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH-66) च्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळून तब्बल १७ वर्षे उलटून गेली, तरीही ३५५ किलोमीटरच्या १० पॅकेजेसचे काम अद्याप अपूर्णच आहे. या प्रचंड विलंबाच्या कारभारामुळे मूळ मंजूर ११,४०९.१४ कोटींचा प्रकल्प खर्च ४८ टक्क्यांनी म्हणजेच तब्बल ५,५००.०८ कोटी रुपयांनी वाढून थेट १६,९०९.२२ कोटींवर गेला आहे; तर प्रकल्पावर आधीच मूळ खर्चापेक्षा जास्त म्हणजेच तब्बल ११,५७७ कोटी रुपये खर्च होऊनही चौपदरीकरणाचा प्रश्न जैसे थेच राहिल्याचे उघडकीस आले आहे. (Mumbai-Goa Highway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

