Weather Update : राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

16
Weather Update : राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Weather Update             राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, विशेषतः अंतर्गत भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. (Weather Update)

येत्या १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ सप्टेंबर रोजी नाशिकमध्येही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २२ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या या पावसामुळे दीर्घकाळ कोरड्या हवामानाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. (Weather Update)

(हेही वाचा – आमदार Sunil Prabhu यांच्या वाहनाचा भररस्त्यात अचानक थरार; नेमकं काय घडलं त्या क्षणी?)

दरम्यान, परभणी जिल्ह्यात जवळपास ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला होता. सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. जमिनीतील ओलावा वाढण्यास या पावसाची मदत होणार असून, पिकांना कितपत फायदा होईल हे आगामी काळातील पावसावर अवलंबून राहणार आहे. (Weather Update)

धाराशिव जिल्ह्यातही दीड महिन्याहून अधिक काळानंतर मध्यरात्री हलक्या सरी बरसल्या. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने जमिनीची तहान अद्याप भागलेली नसली, तरी पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लातूर शहर आणि परिसरातही दीड महिन्यांच्या मोठ्या खंडानंतर रात्री दीड वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस झाला. जोरदार वारे आणि पावसामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. (Weather Update)

(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi : ‘वयाच्या या टप्प्यावर असं क्वचितच पाहायला मिळतं,’ राशिद खान वैभव सुर्यवंशीवर काय म्हणाला?)

हिंगोली जिल्ह्यातही रात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला या पावसाचा फायदा होण्याची शक्यता असून, दीड महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Weather Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.