रशियाकडून तेल घेतलं तर १००% Tariff! पण स्वतः मात्र युरेनियम खरेदी करणार; अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड

रशियाकडून तेल घेतलं तर १००% Tariff! पण स्वतः मात्र युरेनियम खरेदी करणार; अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड

15
Russia Oil Tariff: US Plans 100% Tariff but Continues Uranium Imports
Russia Oil Tariff: US Plans 100% Tariff but Continues Uranium Imports

US 100% tariff on Russian oil  : रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर कारवाईची तयारी करणाऱ्या अमेरिकेने स्वतःच्या अणुऊर्जा क्षेत्रासाठी रशियाकडून होणाऱ्या युरेनियम आयातीसाठी काही सवलती कायम ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रस्तावित निर्बंधांच्या तरतुदींवर चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने बुधवारी ‘द लिंडसे ओ. ग्रॅहम रशिया अँड इराण सॅन्क्शन्स अॅक्ट, २०२६’ या विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकामुळे रशियाकडून कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू खरेदी सुरू ठेवणाऱ्या तसेच रशियावरील निर्बंधांना बगल देणाऱ्या देशांच्या उत्पादनांवर १०० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त आयातशुल्क लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार आहे. भारत आणि चीनसह रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर या प्रस्तावित तरतुदींचा परिणाम होऊ शकतो. मात्र, याच विधेयकात रशियाकडून युरेनियम खरेदीबाबत अमेरिकेसाठी काही महत्त्वाच्या सवलतींची तरतूद करण्यात आली आहे.

विधेयकात नेमक्या कोणत्या सवलती?

विधेयकातील कलम १११ नुसार, रशियाच्या ‘रोसॅटॉम स्टेट अॅटोमिक एनर्जी कॉर्पोरेशन’ आणि तिच्या उपकंपन्यांकडून होणाऱ्या युरेनियम आयातीवर विद्यमान कायद्यानुसार निर्बंध लागू करण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्षांना देण्यात आले आहेत. मात्र, कलम ११४ मध्ये या निर्बंधांना काही अपवाद देण्यात आले आहेत. ‘अॅटोमिक एनर्जी अॅक्ट’च्या कलम १२३ अंतर्गत अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या नागरी अणुसहकार्य कराराशी संबंधित उपक्रमांना निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.याशिवाय, अणुभट्ट्यांसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट प्रकारच्या लो-एनरिच्ड युरेनियमच्या आयातीसह वैद्यकीय समस्थानिकांच्या खरेदीलाही काही परिस्थितींमध्ये निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

अमेरिकेच्या अणुऊर्जा क्षेत्राची गरज

या तरतुदींमुळे रशियाशी संबंधित सर्व अणुऊर्जा व्यवहारांवर पूर्णपणे निर्बंध लावण्याऐवजी अमेरिकेने आपल्या अणुऊर्जा आणि वैद्यकीय क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन काही अपवाद कायम ठेवल्याचे दिसते. एकीकडे रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर आर्थिक दबाव आणण्याची तरतूद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेच्या अणुऊर्जा क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या युरेनियम आणि वैद्यकीय समस्थानिकांच्या पुरवठ्यासाठी अपवाद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या विधेयकातील निर्बंध आणि सवलतींच्या रचनेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.