Jyeshtha Gauri 2026 : गणरायाच्या आगमनानंतर लगबग सुरु होते ती ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची. ज्येष्ठा गौरींना विदर्भात ‘महालक्ष्मी’, मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ असं म्हटलं जातं. ‘लक्ष्मी’ या शब्दापूर्वी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचं आवाहन, पूजन आणि विसर्जन यासोबतच त्यांना दाखवण्यात येणारा नैवेद्य आणि दोरे घेण्याची वेळही महत्त्वाची असते. ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १७ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेल. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश होणार असून, शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करण्यात येणार आहे. शनिवार, १९ सप्टेंबर रोजी चंद्र मूळ नक्षत्रात असताना गौरींचे विसर्जन केले जाईल.
ज्येष्ठा गौरी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती अर्थात आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. भाद्रपद महिन्यात शेतामध्ये धान्य तयार होत असते. त्यामुळे या काळात निर्मितीशक्ती आणि निसर्गशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठा गौरींची पूजा केली जाते. महाराष्ट्रासह विविध प्रदेशांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजेच्या परंपरांमध्येही काही फरक आढळतो. काही ठिकाणी खड्याच्या गौरी पूजल्या जातात, तर काही भागांत तेरडा या वनस्पतीला गौरीचे स्वरूप मानून तिची पूजा केली जाते. काही ठिकाणी धान्याच्या राशीवर गौरींचे मुखवटे ठेवून पूजन करण्याची परंपरा आहे.
ज्येष्ठा गौरींच्या पूजेदरम्यान विविध प्रकारचे नैवेद्य दाखविण्याची प्रथा असून, काही परंपरांमध्ये १६ प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. गौरी म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, निसर्ग आणि निर्मितीशक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपराही या उत्सवातून जपली जाते. माहेरी आलेल्या लेकीप्रमाणे ज्येष्ठा गौरींचे स्वागत केले जाते. सासरी गेलेली कन्या माहेरी आल्यावर आई ज्या प्रेमाने तिचे लाड पुरवते, त्याच भावनेने गौरींचे आगमन, पूजन आणि पाहुणचार केला जातो. त्यामुळे ज्येष्ठा गौरींच्या आगमनाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे.
Join Our WhatsApp Community

