जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा ६० दिवसांसाठी व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी खुली करण्याबाबत इराण आणि ओमान (Iran-Oman) यांच्यात प्राथमिक करार झाल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र, या कराराला इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (SUPREME NATIONAL SECURITY COUNCIL) अंतिम मंजुरी अद्याप मिळालेली नसून, त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कराराचा मुख्य उद्देश होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करणे आणि जागतिक पुरवठा साखळीवरील ताण कमी करणे हा आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची आणि नैसर्गिक वायूची वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने या निर्णयाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.
(हेही वाचा –Petrol Diesel Price Today : इंधनाच्या दरात काय नवे बदल? जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर)
करारानुसार, इराणमध्ये प्रवेश करणारी व्यापारी जहाजे इराणच्या किनाऱ्यालगतच्या मार्गाचा वापर करतील. इराणमधून बाहेर पडणारी जहाजे ओमानच्या किनाऱ्यालगतच्या मार्गाने प्रवास करतील. तसेच या व्यवस्थेसाठी जहाजांकडून कोणतेही मार्गक्रमण किंवा सेवा शुल्क आकारले जाणार नाही. कराराला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतताविषयक सामंजस्याच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यापारी जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी दोन्ही देशांमध्ये पुढील स्तरावरील चर्चाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी इराणच्या भूभागावर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण अधिक कडक केले होते. त्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित जहाजांच्या सुरक्षित प्रवासावर विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावरील जहाजवाहतुकीवर परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत इराण-ओमान (Iran-Oman) कराराला जागतिक व्यापार (Global Trade) आणि ऊर्जा बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

