-
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan Crime : नात्याला लांछन लावणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या एका विकृत नराधमाला अखेर कायद्याचा धाक बसला आहे. जन्म दिलेल्या ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला कल्याण सत्र न्यायालयाचे (Kalyan Court) न्यायाधीश लक्ष्मीकांत बिडकर यांनी जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे.
ही घटना कल्याण पूर्वेकडे असलेल्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१२ साली घडली होती. परिसरातील एका जागरूक रहिवाशाने हा घृणास्पद प्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या समाजकंटकाला बेड्या ठोकल्या. त्या दिवसापासून आजतागायत हा नराधम आधारवाडी कारागृहात (Adharwadi Jail) खितपत पडलेला आहे.
(हेही वाचा – “माफी मागा अन्यथा…”, PM मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी मार्क झुकरबर्गना तीन दिवसांचा अल्टीमेटम!)
कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस अधिकारी आर. पी. देशमुख यांनी या प्रकरणाचा चिवटपणे तपास केला. पिडीत चिमुरडीचा जबाब, वैद्यकीय पुरावे आणि ठोस साक्षीदार यांच्या आधारावर पोलिसांनी भक्कम आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. तब्बल १४ वर्षे हा खटला न्यायालयात सुरू होता. अखेर पुराव्यांच्या बळावर न्यायालयाने या विकृत बापाला जन्मभर मागे वळून पाहू न शकणारी शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी आहे. लहान मुलींकडे वाकडी नजर टाकणाऱ्या प्रत्येक विकृताला हा निकाल इशारा आहे. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही.
अत्याचाराच्या गुन्ह्यात तडजोड असंभव – वपोनि नितीन पगार
या संदर्भात कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार (Nitin Pagar) यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांकडून कोणतीही तडजोड केली जात नाही. तपास यंत्रणेच्या कठोर मेहनतीमुळे आणि न्यायालयाच्या ठोस भूमिकेमुळे गुन्हेगाराला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिसांनी दाखवलेल्या संयम आणि चिकाटीमुळे पिडीत मुलीला न्याय मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

