
Amarnath Yatra: कलम ३७० रद्द करण्याच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याने बुधवारी जम्मू येथील छावणीतून सुरू असलेली अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
जम्मूतील भगवती नगर तळ छावणीतून आजच्या दिवसापुरती अमरनाथ यात्रा स्थगित करण्यामागचे कोणतेही विशिष्ट कारण प्रशासनाने दिले नसले, तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
आज सकाळी जम्मू येथील तळ छावणीतून अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गांदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही तळ छावण्यांकडे जाण्यासाठी यात्रेकरूंची कोणतीही नवी तुकडी रवाना करण्यात आली नाही, असेही त्यांनी सांगितल्यांचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा – Rohit Sharma Selectors Controversy : रोहित शर्मावरुन अजित आगरकरवरच टांगती तलवार?
सूत्रांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा दलांच्या ताफ्यांची वाहतूकही तात्पुरती थांबवण्यात आली आहे. कश्मीरला देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा सर्व हवामानात सुरू राहणारा एकमेव महत्त्वाचा रस्ता असून, सुरक्षा यंत्रणांना या धोरणात्मक मार्गावरील हालचाल कमी करायची असते, तेव्हा अशा प्रकारचा उपाय सामान्यतः केला जातो.
यंदाची अमरनाथ यात्रा…
देशातील सर्वात मोठ्या वार्षिक धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी बहुस्तरीय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. सुरक्षा परिस्थितीचा आढावा आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, प्रशासन वेळोवेळी यात्रेच्या हालचालींच्या आराखड्याचा फेरआढावा घेत असते. यंदा आतापर्यंत ३,८८० मीटर उंचीवर दक्षिण हिमालयात असलेल्या पवित्र अमरनाथ गुहेत ४ लाख ६० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. यंदाची अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली असून, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी तिची सांगता होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
