‘एका पोस्टने पेटला राजकीय वाद’; ‘गुंगी गुडिया’ टिप्पणीवरून Congress कार्यालयात राष्ट्रवादीची जोरदार घोषणाबाजी

72
'एका पोस्टने पेटला राजकीय वाद'; 'गुंगी गुडिया' टिप्पणीवरून Congress कार्यालयात राष्ट्रवादीची जोरदार घोषणाबाजी
'एका पोस्टने पेटला राजकीय वाद'; 'गुंगी गुडिया' टिप्पणीवरून Congress कार्यालयात राष्ट्रवादीची जोरदार घोषणाबाजी
  • विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसच्या (Congress) अधिकृत सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या पोस्टचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईतील कुलाबा येथील काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सोमवारी काँग्रेसने (Congress) सोशल मीडियावर बीड दौऱ्यातील सुनेत्रा पवार यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बोलत असताना सुनेत्रा पवार शांत असल्याचा संदर्भ देत “त्या अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ राहणार?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या शब्दप्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत तो महिलांचा अवमान करणारा असल्याचा आरोप केला.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. त्यांनी काँग्रेसविरोधी घोषणा देत संबंधित पोस्टबद्दल सार्वजनिक माफीची मागणी केली. तसेच या प्रकरणाचा जाब काँग्रेस नेतृत्वाला विचारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

(हेही वाचा – Revamped Khelo India Scheme : खेळाडूंना मिळणार कोणते नवे फायदे? जाणून घ्या महत्त्वाचे बदल)

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सूरज चव्हाण यांनी काँग्रेसवर महिलांचा अवमान केल्याचा आरोप केला. “महिला नेतृत्वाचा सन्मान करण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसनेच एका महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी अपमानास्पद भाषा वापरली आहे. कदाचित त्यांना इंदिरा गांधींचाही विसर पडला असावा,” असा टोला त्यांनी लगावला.

सुनेत्रा पवार यांच्या वाढत्या राजकीय सक्रियतेमुळे काँग्रेस (Congress) अस्वस्थ झाली असून त्यातूनच अशा प्रकारची भाषा वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभरातील काँग्रेस कार्यालयांबाहेर आंदोलन करून जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या सोशल मीडिया पोस्टवरून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला असून, या वादाचे पुढे कोणते राजकीय पडसाद उमटतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.