KDMC च्या रूक्मिणीबाई रूग्णालयाचा हलगर्जीपणा; अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेतच राहिली रेबीजच्या इंजेक्शनची तुटलेली सुई

106
KDMC च्या रूक्मिणीबाई रूग्णालयाचा हलगर्जीपणा; अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेतच राहिली रेबीजच्या इंजेक्शनची तुटलेली सुई
KDMC च्या रूक्मिणीबाई रूग्णालयाचा हलगर्जीपणा; अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेतच राहिली रेबीजच्या इंजेक्शनची तुटलेली सुई
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) कल्याणातील रूक्मिणीबाई रूग्णालयात (Rukminibai Hospital) वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरड्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना तुटलेली सुई थेट त्याच्या कमरेतच अडकून राहिली. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र मुलाला असह्य वेदना होऊ लागल्याने पालकांनी खासगी ठिकाणी एक्स-रे काढला आणि हा गंभीर प्रकार उघड झाला.

कल्याण-मलंगगड रोडला (Kalyan-Malanggad Road) असलेल्या काका ढाबा परिसरात राहणारे सूर्यभान आणि काजल पांडे यांच्या अडीच वर्षांच्या कावेश याला काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. उपचारासाठी त्याला केडीएमसीच्या (KDMC)  रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टर आणि नर्सनी त्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिले. मात्र इंजेक्शन देताना सुई तुटून मुलाच्या कमरेच्या भागातच राहिल्याचे नंतर स्पष्ट झाले.

(हेही वाचा – नोकरीच्या नोंदींमधील चुकांबाबत EPFO​​चा सदस्यांना इशारा, पीएफ आणि पेन्शनचे लाभ सुरक्षित ठेवायचे असतील तर…)

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आल्यावर कावेश सतत रडत होता आणि त्याला वेदना होत होत्या. पालकांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्यांनी खासगी रूग्णालयात (Private hospital) नेऊन एक्स-रे काढला. त्यात मुलाच्या कमरेत इंजेक्शनची तुटलेली सुई असल्याचे आढळून आले. हा रिपोर्ट पाहताच आई-वडील आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पालकांनी पुन्हा रूग्णालयात जाऊन याबाबत जाब विचारला. मात्र रूग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सध्या कावेशवर पुढील उपचार सुरू असून सुई काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात यापूर्वीही उपचारातील निष्काळजीपणाच्या तक्रारी आल्या आहेत. पुन्हा एकदा एवढ्या लहान मुलाच्या बाबतीत असा प्रकार घडल्याने परिसरातील रहिवाशांसह पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की सरकारी रूग्णालयात उपचारासाठी जावे की नाही याच भीतीने आता रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक ग्रासले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे चिमुरड्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

या प्रकरणी सूर्यभान पांडे यांनी दोषी डॉक्टर आणि नर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.