KDMT च्या बसगाड्यांची दुरावस्था; खिडक्यांना काचा नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात

99
KDMT च्या बसगाड्यांची दुरावस्था; खिडक्यांना काचा नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात
KDMT च्या बसगाड्यांची दुरावस्था; खिडक्यांना काचा नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन (KDMT) उपक्रमातील बसेसच्या दयनीय अवस्थेमुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. डोंबिवली (Dombivli) आणि कल्याण (Kalyan) परिसरातील अनेक मार्गांवर धावणाऱ्या बसेसच्या खिडक्यांना काचा नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये केडीएमटीची (KDMT) एक बस उघड झाली आहे. या बसच्या दोन्ही बाजूंच्या खिडक्यांमधील काचा पूर्णपणे गायब आहेत. त्यांच्या जागी केवळ तुटक्या लोखंडी पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. बस धावत असताना रस्त्यावरील धूळ, कचरा, चिखल आणि पावसाचे पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर येत आहे. व्हिडिओमध्ये सीट्स फाटलेल्या, हँडल निखळलेले आणि आतला पोल सैल झालेला दिसत आहे. बसच्या आतून देखील आवाज आणि धक्के जाणवत आहेत.

नित्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले की, सकाळी कार्यालय आणि शाळा-कॉलेजच्या (School-College) वेळी ही बस कोंबून भरते. अशा परिस्थितीत खिडकीला काच नसल्याने लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांना सर्वात जास्त धोका आहे. अचानक ब्रेक लागल्यास किंवा रस्त्यातील खड्ड्यामुळे बस जोरात हेलकावे खाल्ल्यास प्रवासी खिडकीतून बाहेर फेकले जाण्याची भिती असते. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. पाणी आणि चिखल अंगावर उडल्याने अनेक प्रवासी आजारी पडत आहेत. उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा आणि हिवाळ्यात थंड वारा थेट आत येत असल्याने प्रवास करणे दुरापास्त झाले आहे.

(हेही वाचा – Kalyan : कल्याणकरांचा प्रवास की ‘जीवघेणी कसरत’? स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाची दुरवस्था)

परिवहन सेवा ही कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील कष्टकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाची जीवनवाहिनी आहे. दररोज हजारो प्रवाशांना या बसेसवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून बसेसच्या देखभाल/दुरूस्तीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक वाहनामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी (Passenger Safety) सर्व खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र केडीएमटीच्या (KDMT) अनेक बसेस या नियमाला बगल देत रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे केवळ प्रवाशांचाच नव्हे तर रस्त्यावरील इतर वाहनांच्या चालकांचाही जीव धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमटी प्रशासनाने तातडीने सर्व बसेसची तपासणी करून खराब झालेल्या खिडक्यांना काचा बसवाव्यात, सीट्स आणि हँडल दुरूस्त करावेत, अशी मागणी त्रस्त प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य न दिल्यास प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.