
- कल्याण : प्रतिनिधी
कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) हा मार्ग दररोज हजारो पादचारी आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण, खड्डे आणि बेशिस्त पार्किंगमुळे कल्याणकरांना रस्त्याऐवजी गटारांच्या काठाने आणि वाहनांच्या मध्ये जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ही परिस्थिती स्पष्टपणे दिसून आली आहे. (Kalyan)
(हेही वाचा – JPSC परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात झारखंड CID ची मोठी कारवाई; राज्यभरातील १८ ठिकाणी छापेमारी)
या व्हिडिओमध्ये स्टेशनच्या बाहेर पडताच पदपथावर हातगाड्या, दुकानांचे सामान आणि बेकायदेशीर पार्किंग (Illegal parking) केलेल्या दुचाकी-चारचाकी दिसत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. महिला, वृद्ध आणि शाळकरी मुले रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना दिसत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्याने चालणे आणखी अवघड झाले आहे. सकाळ-संध्याकाळी या मार्गावर प्रचंड गर्दी असते. लोकलमधून उतरलेले प्रवासी, बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या गृहिणी आणि शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर होते. पदपथावर पाणी साचते आणि रस्त्यावरून चालणे म्हणजे जीव मुठीत धरण्यासारखे असल्याचे कल्याणकरांचे म्हणणे आहे. (Kalyan)
अतिक्रमण हटाव मोहिमेचा फज्जा
स्थानीय व्यापारी आणि प्रवासी संघटनांनी अनेकदा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अतिक्रमण हटाव मोहीम काही दिवस चालते आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती होते, असा आरोप कल्याणकरांकडून (Kalyan) करण्यात येत आहे. केडीएमसीने तातडीने पदपथावरील अतिक्रमण हटवावे, अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. अन्यथा या प्रश्नासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
