- डॉ. शशांक शहा
Obesity Health : बदलत्या जीवनशैली बरोबरच गेल्या काही वर्षांत जंक फूडकडे (junk food) वाढता कल आणि त्यासोबत वाढणारा लठ्ठपणा (Obesity Health) हे आरेग्याच्यादृष्टीने मोठे आव्हान ठरत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय पोषण संस्था (एनआयएन) यांच्या अहवालानुसार, देशात जंक फूडच्या विक्रीत तब्बल १५० टक्क्यांनी वाढ झाली असून १५ ते ४९ वर्षे वयोगटातील २३.५ टक्के भारतीय वाढते वजन तसेच लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. ही आकडेवारी बदलत्या आहारशैलीचे आणि त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधीत धोक्यांचे चित्र स्पष्ट करते.
एकेकाळी भारतीय घरामध्ये प्रत्येकाच्या ताटात भाकरी, भात, डाळ, भाज्या, ताक आणि घरगुती पदार्थांना (Homemade foods) महत्त्वाचे स्थान होते. मात्र, शहरीकरण, व्यस्त जीवनशैली आणि पाश्चात्त्य खाद्यसंस्कृतीच्या प्रभावामुळे फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स, शीतपेय आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्समुळे कोणत्याही वेळी हवे ते खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने आहाराच्या चुकीच्या सवयी देखील वाढू लागल्या आहेत. (Obesity Health)
जंक फूडमध्ये मीठ, साखर, फॅट्स आणि स्वादवर्धक पदार्थांचे प्रमाण अधिक असते. हे पदार्थ मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या रसायनांवर परिणाम करतात, त्यामुळे त्यांची वारंवार इच्छा निर्माण होते. आकर्षक जाहिराती, रंगबेरंगी पॅकेजिंग आणि सेलिब्रिटींच्या प्रचारामुळे विशेषत: किशोरवयीन मुले आणि तरुण वर्ग या पदार्थांकडे अधिक आकर्षित होत असल्याचे पाहायला मिळते. परिणामी, पौष्टिक आहाराऐवजी उच्च कॅलरीयुक्त पण कमी पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचे सेवन वाढत आहे. (Obesity Health)
(हेही वाचा – VIDEO: ग्रीसमध्ये वणवा विझवणाऱ्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेत टक्कर; पाहा नेमकं काय घडलं?)
लठ्ठपणा हा केवळ शरीराच्या आकाराशी संबंधित प्रश्न नाही. त्यातून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फॅटी लिव्हर, सांध्यांचे विकार आणि कर्करोगाचा धोका वाढतो. चिंताजनक बाब म्हणजे लठ्ठपणासोबतच मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप-२ मधुमेहाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, स्क्रीनसमोर घालवला जाणारा वाढता वेळ आणि अयोग्य आहार यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे. (Obesity Health)
या पार्श्वभूमीवर सरकारसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. जंक फूडवरील नियंत्रण, पॅकेजिंगवरील स्पष्ट पोषणमूल्य माहिती, मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध आणि शाळांमध्ये आरोग्यदायी खाद्यपदार्थांना प्रोत्साहन यासारख्या उपाययोजनांची गरज आहे. मात्र, यासोबतच व्यक्तिस्वातंत्र्य आणि ग्राहकांच्या निवडीचा अधिकार यांचाही विचार करावा लागणार आहे. (Obesity Health)
या समस्येवर मात करण्यासाठी केवळ सरकारी धोरणे पुरेशी ठरणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीने संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि घरगुती जेवणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांमध्ये आहाराच्या चांगल्या सवयी रुजवणे आणि शाळांनी पोषणविषयक शिक्षणावर भर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जंक फूडची वाढती भूक आणि लठ्ठपणाचा वाढता धोका यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर भविष्यात भारताला जीवनशैलीजन्य आजारांच्या आणखी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. (Obesity Health)
(लेखक पुणे येथे बेरिएट्रिक सर्जन आहेत.)
हेही पहा –


