Jharkhand Student Protest : झारखंडमध्ये भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. महाविद्यालयीन परीक्षा, जेएसएससी-सीजीएल आणि इतर भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता व्यापक पाठिंबा मिळू लागला आहे. विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनिश्चित काळासाठी अन्न-पाणी त्याग करून उपोषण सुरू केले असून, या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टी (CJP) तसेच अभिजीत दीपके यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
आंदोलक विद्यार्थ्यांनी १४ वी जेपीएससी (JPSC) पूर्व परीक्षा रद्द करण्याची, कथित पेपरफुटीची सखोल चौकशी करण्याची आणि राज्यातील भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त असले, तरी विद्यार्थी त्यावर समाधानी नाहीत. जेपीएससी आणि जेएसएससीमार्फत घेण्यात आलेल्या भरती परीक्षांतील कथित गैरव्यवहारांची सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांकडून स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. (Jharkhand Student Protest)
हेही वाचा: Maharashtra SDRF : पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदतीचा हात; महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी?
जेपीएससी आणि जेएसएससीमधील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेविरोधात रांचीतील जयपाल सिंह स्टेडियमवर सुरू असलेले आंदोलन रविवारी नवव्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली.
महातो यांनी सांगितले की, १४ वी जेपीएससी पूर्व परीक्षा रद्द करणे, वादग्रस्त परीक्षा संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या जेपीएससी, जेएसएससी-सीजीएल तसेच इतर भरती परीक्षांची निष्पक्ष चौकशी करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. (Jharkhand Student Protest)
आंदोलनाची पार्श्वभूमी
देवेंद्र नाथ महातो यांच्या मते, १४ व्या जेपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल गेल्या महिन्याच्या २ तारखेला जाहीर झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. त्यानंतर ५ जुलैपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ७ जुलै रोजी राज्यपालांची भेट घेण्यात आली, तर ८ जुलै रोजी निषेध नोंदवण्यात आला. पुढे २० जुलै रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेऊन पुरावे सादर करण्यात आले. त्यानंतर अधिकृत चौकशी प्रक्रिया सुरू झाली असून, तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
हेही वाचा: एसटीला ‘पांडुरंग पावला’! Ashadhi Wari दरम्यान कमाईचा नवा विक्रम; तिजोरीत ‘इतके’ कोटी जमा
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय
महातो यांनी सांगितले की, आंदोलनाच्या पाचव्या दिवशी विद्यार्थ्यांनी ‘संविधान मार्च’चे आयोजनही केले होते. मात्र, सरकारकडे सादर केलेल्या निवेदनातील मागण्या अद्याप पूर्णपणे मान्य झालेल्या नाहीत. झारखंड सरकार आणि संबंधित आयोगांची सध्याची भूमिका विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्ची करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला. (Jharkhand Student Protest)
“विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकून राहावा आणि हा संघर्ष अधिक प्रभावीपणे पुढे जावा, यासाठी मी आजपासून अन्न-पाणी त्याग करून अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करत आहे,” असे देवेंद्र नाथ महातो यांनी स्पष्ट केले. आंदोलन पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


