Veer Savarkar : फिर देर क्यों, उठो भाई हम ही हमारे वाली है…

80
Veer Savarkar : फिर देर क्यों, उठो भाई हम ही हमारे वाली है...
Veer Savarkar : फिर देर क्यों, उठो भाई हम ही हमारे वाली है...
  • मंजिरी मराठे

सेल्युलर कारागारातील (Cellular Jail) बंदीवानांच्या दुरवस्थेची माहिती घेऊन कारामंडळ परतले. “जर सुधारणा यशस्वी होत गेल्या तर क्रांतिकारक शांतिमय मार्गाचा अवलंब करतील,” या सावरकरांच्या वक्तव्यातील जर-तर मुळे सावरकर बंधूंची मुक्तता होणं कठीणच होतं. नारायणराव आणि इतरांच्या अथक प्रयत्नांमुळे हिंदुस्थानच्या राजबंदींची मुक्तता व्हावी, अशी मागणी करणारं मुंबईच्या “राष्ट्रीय संघा”चं (नॅशनल युनियन) सत्तर हजारांवर स्वाक्षऱ्याचं आवेदन शासनाला देण्यात आलं.

क्रांतिकारकांना सामान्य जनता दुष्ट, स्वार्थी, पापी अपराध्यांहून वेगळं मानत नाही, असं ब्रिटिशांनी पसरवलं होतं. क्रांतिकारकांचं नाव उघडपणे घ्यायला अनेकजण, कित्येक वर्तमानपत्रं सुद्धा कचरत असताना क्रांतिकारकांच्या वीरवृत्तीचा सन्मान करण्यासाठी सहस्रावधी नागरिक एकत्र आले. त्याबद्दल १९२०मध्ये भावाला लिहिलेल्या पत्रात सावरकरांनी देशबंधूविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर काही दिवसांतच एक शीख राजबंदी धावत येऊन सावरकरांना (Veer Savarkar) म्हणाला, ‘‘बाबूजी, मुक्तता! राजबंदींस सोडण्याची आज्ञा आली आहे. तुम्ही सुटलेत! बाबूजी तुम्ही सुटलेत!’’

पण सुटका हा शब्द ऐकून सावरकरांना (Veer Savarkar) फारसं काही वाटलं नाही. कारण १९११ पासून त्यांनी हा शब्द असंख्य वेळा ऐकला होता. कित्येक राजबंदी आले आणि गेले पण सावरकर बंधुंसह काही राजबंदी तिथेच होते. इतक्या वर्षात बाहेरून बातम्या मिळवण्याची व्यवस्था मात्र चोख जमली होती. त्यामुळे एका बंदीवानानं सावरकरांच्या हाती एक तार दिली आणि मोठ्या आनंदानं त्यानं, “आता तरी पटलं ना” म्हणून विचारलं. त्या तारेतील वाक्य होतं, सार्वजनिक शांततेला अनुकूल वाटेल तितकाच या राजक्षमेचा (amnesty) उपयोग करावा याचाच अर्थ, सगळे राजबंदीवान सुटणार नाहीत आणि आपण बंधुद्वय तर त्यात निश्चितच नसणार हे सावरकरांना कळून चुकलं. त्यामुळे सगळे सुटले नाहीत तरी जे सुटतील ती आपल्यासाठी आनंदाचीच बाब आहे. पण कोणीही आशेवर राहू नका, असं सावरकर सगळ्यांना समजावत होते. पण कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतं… आणि झालंही तसंच. सावरकर बंधू आणि इतर अनेकांची सुटका झाली नाही. कारण बंदीवानांची मुक्तता ही त्यांच्या अंदमानातील वागणुकीवर नव्हे तर त्यांच्या उपद्रवमूल्यावर अवलंबून होती.

(हेही वाचा – Maharashtra Weather Update : हवामान विभागाचा इशारा! ‘या’ ६ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा)

ज्यांची मुक्तता झाली त्यांच्याकडून ‘यापुढे मी पुन्हा कधीही – किंवा अमुक वर्ष राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. माझ्यावर पुन्हा राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी उरलेली जन्मठेपही भरीन!’ अशा करारपत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. सुरुवातीला अशा अटी मान्य करणं काही राजबंदीवानांना पटत नव्हतं. सगळ्यांमध्ये बरीच चर्चा झाली. वर्षानुवर्ष हाल सोसूनही अनेकांना आपला बाणा सोडायचा नव्हता हे पाहून आपलं भविष्य निश्चितच उज्वल आहे, याचं सावरकरांना समाधान वाटलं. पण शत्रूला दिलेली वचनं ही पाळण्यासाठी नसतात. राष्ट्रहितासाठी अटी मान्य करणं आवश्यक असतं, हे सावरकरांनी भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज अशांच्या रणनीतीची उदाहरणं देऊन पटवून दिलं. इथून मुक्तता झाल्यावर पुन्हा देशकार्य हाती घेता येईल हे सावरकरांचं म्हणणं राजबंदीवानांना पटलं आणि सर्वांनी करारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. सुटका झालेल्यांनी देशस्वातंत्र्यासाठी पुढं काय करायला हवं याबाबत सावरकरांनी आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

भाई परमानंद यांना कारागारात येऊन पाच वर्षही झाली नव्हती, पण तिथल्या छळाला कंटाळून त्यांनी अन्न सोडलं, तेव्हा त्यांना नाकानं नळीतून बळेबळे दूध पाजण्यात येऊ लागलं. सावरकरांसह अनेकजण त्यांना आत्मक्लेशापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते. राजक्षमा मिळण्याची वार्ता आली आणि त्यांनी अन्नग्रहण करण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसांत त्यांच्या सुटकेची आनंदाची बातमी आली. “आपली सुटण्याची वास्तविक पाळी! मला जाणे किती संकोचास्पद वाटते!” असं म्हणत अश्रुपूर्ण नयनांनी भाई परमानंद यांनी सावरकरांचा निरोप घेतला. “आपणास जाताना पाहून आम्हास आम्ही सुटलो नाही याची आठवणही न होऊ देणारा उत्कट आनंद होत आहे”, असं सावरकर (Veer Savarkar) त्यांना म्हणाले.

काही जणांसाठी का होईना पण त्या विक्राळ कारागाराचं कुलूप उघडलं गेलं. टोळ्या टोळ्यांनी मंडळी बाहेर पडू लागली. शीख आणि इतर काही राजबंदीवान तर एका सूरात क्रांतीगीतं गात निघाले. ते पहाताच ‘हे सैतान जन्मठेप भोगायला येणार पुन्हा अंदमानात,’ असं तिथला आयुक्त उद्गारला आणि याचं उदाहरण म्हणजे सावरकरांप्रमाणेच आवेदन देऊन सुटका करून घेतलेले सच्चिंद्रनाथ सन्याल काकोरी कटातील सहभागाबद्दल पकडले गेले आणि पुन्हा जन्मठेप भोगण्यासाठी अंदमानात आले.

सावरकर बंधुद्वय सुटले नाहीत त्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या सुटकेची मागणी जोर धरू लागली. दिल्लीच्या विधिमंडळात, वृत्तपत्रातून याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. राष्ट्रीय सभेच्या बैठकीत, सावरकर बंधू आणि इतर काहींना शासनानं सोडावं, असा ठराव करण्यात आला… आणि सावरकरांचं भाग्य उजळलं… त्यांनाही मुक्तता मिळाली… पण ती केवळ त्यांच्या चाळीतून कारागृहाच्या अंगणात उतरू देण्याची. त्यांना कोठडीतच लिखाणाचं काम देण्यात आलं. कोणीतरी एक राजबंदी हिंदुस्थानात पत्र लिहिण्याचा प्रयत्नात असताना पकडला गेला आणि सावरकरांचं ते कामही बंद झालं! सावरकरांना अंदमानात येऊन दहा वर्ष होत आली होती. त्यामुळे त्यांनी नियमानुसार मला कारखान्यात, छापखान्यात काम द्या, ‘तिकिटा’वर अंदमानात वसती करण्याची परवानगी द्या, अशा मागण्या केल्या. पण अजून दहा वर्षं पूर्ण व्हायला बरेच दिवस आहेत, असं उत्तर त्यांना मिळालं. पुढे त्यांना तेलाच्या गोदामावर ‘फोरमन’ करण्यात आलं आणि एक रुपया महिना वेतन मिळू लागलं. सावरकर (Veer Savarkar) लिहितात, “इतरांनी जेव्हा आम्हास विनोदाने म्हणावे, तुमच्यामागून आलेले अगदी अल्पशिक्षित बंदीवान देखील मोठमोठे ‘बाबू’ होऊन अधिकार गाजवीत असता तुम्हास नुसते ‘तेलगोदामाचे’ व्यवस्थापक नेमले ना? काय हे! तेव्हा आम्ही विनोदाने प्रत्युत्तर द्यावे; बाबू तर काय, पण प्रत्यक्ष बंदीवान, पर्यवेक्षक, कमिशनर हे देखील नुसते (Man) म्हणजे मनुष्य आहेत. पण आम्ही (Foreman) फोरमन म्हणजे मनुष्यांचा अग्रणी! सरकारने आमचे मूल्य अखेर ओळखले. व्हॉईसरॉयला जो मान नाही तो मान आम्हास दिला. (Foreman)! नराग्रणी! आणखी काय पाहिजे!”

त्या कारागारीय राज्यात ‘तेल कोठार’ हे इतरांस मत्सर वाटावा असे वैभवाचे ठिकाण होते. बंदीवानांना कोलूला जुंपून जमा केलेले सहस्रावधी पौंड तेल विकले जात असे. पण ते पद, एक रुपया वेतन यापेक्षा सावरकरांना सुखावणारी गोष्ट होती ती म्हणजे त्यांच्या हातात आता कागद आणि लेखणी आली. जुने कागद चिकटवून त्यांनी एक वही बनवली, त्यात चित्र चिकटवली, त्याला मथळे दिले. सुरुवात झाली ती रामायणापासून आणि पुढील पानांवर लिहिल्या गेल्या दोन उर्दू गजल आणि एक कविता. १९१०मध्ये पकडले गेल्यानंतर देशाप्रतीच्या ऋणाचा ‘पहिला हप्ता’, असं म्हणत व्यक्त केलेला, सरळ सरळ उठावाची भाषा असणारा विचारच दहा वर्ष छळ सोसूनही उर्दू कवितेत व्यक्त झाला.
ब्रिटिशांसाठी राजद्रोहच ठरणारा तो विचार असलेली वही ब्रिटिशांना सापडली असती तर सावरकर अंदमानातून कधीही सुटले नसते. पण देशस्वातंत्र्यासाठी मरेतो झुंजण्याचं व्रत घेतलेल्या सावरकरांनी त्याची तमा कधीच बाळगली नाही आणि म्हणूनच ते लिहितात –

हन्ता रावण का है अपना राम वीरवर सेनानी |
कर्मयोग का देव है स्वयं कृष्ण सारथी अभिमानी|
भारत तेरे रथ को सेना कौन रोकनेवाली है फिर देर क्यों उठो भाई हम ही हमारे वाली है ||

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.