Veer Savarkar : बुडालेल्या पैशांची खंत नव्हे, जनतेप्रती कर्तव्याची जाणीव!

81
Veer Savarkar : बुडालेल्या पैशांची खंत नव्हे, जनतेप्रती कर्तव्याची जाणीव!
Veer Savarkar : बुडालेल्या पैशांची खंत नव्हे, जनतेप्रती कर्तव्याची जाणीव!
एकदा कोणताही निश्चय ठरल्यानंतर ते त्यापासून कधीच विचलित होत नसत. संकटकालात ज्योतिषी आणि भरभराटीच्या काळात मतलबी नि भामटे माणसाभोवती गोळा होत असतात हा अनुभव आहे. तात्याही (स्वातंत्र्यवीर सावरकर) यातून सुटले नाहीत. महाराष्ट्रात महायुद्धाच्या काळात ज्या अनेक कंपन्या स्थापन झालेल्या होत्या त्यांचे संचालक आणि इतर लोक सावरकर सदनात घोटाळू लागले. त्यांच्यासारख्या त्यागी वीराचा पैसा प्राण गेला तरी बुडू देणार नाही, स्वत: गहाण राहू पण तुमचा पै-पैसा परत करू, तुम्हाला भरपूर व्याज देऊ, ते आमचे कर्तव्य आहे, अशा तऱ्हेच्या भुलभलावणीत सापडून त्यांनी पुष्कळ रक्कम ठेवीत गुंतविली. व्यवसायाचा, व्यापाराचा अनुभव नसताना महाराष्ट्रात पावसाळी छत्र्यांप्रमाणे निघालेल्या बहुतेक कंपन्या बुडाल्या. त्यात अनेक अबलांचे, गरिबांचे कोट्यवधी रुपये गडप झाले. त्याच वावटळीत तात्यांनाही फार मोठी झळ पोचली. (Veer Savarkar)
गांधीवधाच्या खटल्यातही मानेवर टांगती तलवार असताना त्यांना अनेक कटू अनुभव आले. या सर्वांचा साकल्याने परिणाम होऊन उत्तर आयुष्यात काही वेळा भोवतालच्यांना किंवा निकटवर्तीयांना कोडे वाटावे अशा तऱ्हेची त्यांची वर्तणूक होत असे. अशाच एका प्रसंगी मी (श्री.पु.) त्यांना (वीर सावरकर) विचारले, “तुम्हाला पैशांची अत्यंत अडचण आहे असे पुण्यात म्हणत आहेत, आपण नुसती संमती द्या – मासिक एक सहस्त्र रुपयांपर्यंत जमवून पाठवीत जाऊ. या कानाचे त्या कानाला कळणार नाही.” (Veer Savarkar)
“अरे, मी आता असा किती जगणार आहे! मला काही नको. कोणीही जमवून द्यायला नको. मी आजपर्यंत जे जे केले त्याचे पुरेपूर कौतुक सर्व हिंदूंनी केलेले आहे. मला काही कमी पडलेले नाही. पण म्हातारपणी मला काळजी वाटते, हे मात्र खरे हं! माझ्या घरात मिळवणारे कोण आहे? तू बघतोसच विश्वासचे. त्याला जेवढे मिळते ते त्याच्या टोचण्यात (मधुमेहाची इंजेक्शने) जाते. म्हातारपणी सगळा भार वाहायचा म्हणजे जड वाटते, काळजी वाटते.” (Veer Savarkar)
“तात्या, तुम्हाला काळजी करण्याची वेळ यावी. मग आम्ही लोक कशाला आहोत?”
“ते सर्व खरे, पण तुला वाटते तेवढा पैसाही माझ्याजवळ शिल्लक नाही. अनेक प्रकारांनी मी कसा बुडालेलो आहे हे तुला ठाऊकच आहे.”
“खटल्यात काही व्यक्तींनी कसा गैरलाभ उपटला ते मला कळलेय! त्या रकमा मोठ्या असल्या तरी तुम्ही ज्या पद्धतींनी पैसे गुंतविलेत त्या ठेवी बुडल्या नसल्या तरच नवल होते!”
“अरे, ज्यांना ज्यांना पैसे दिले ते व्याज देणार होते हे खरे! पण केवळ व्याजाच्या कल्पनेने-सावकारी दृष्टीने मी त्या रकमा दिल्या नव्हत्या! महाराष्ट्रात कारखानदारी उभी राहात होती, नवे नवे तरुण उत्साहाने व्यापारात आणि त्यातही उत्पादनाच्या व्यवसायात शिरत होते. लोकांनीच मला दिलेला पैसा मी परत देत होतो. हे माझे कर्तव्यच होते. कोणी मला बुडवायचे म्हणून काही केले, असे मला नाही वाटत. धंद्यात ते नवीन होतेच, पण आवश्यक तो अनुभव त्यांना नव्हता, पुरेशी कल्पना नव्हती म्हणून त्यांना अपयश आले!”
“ते खरे असले तरी शेठ गुलाबचंदांच्या सूचनेप्रमाणे तुम्ही त्यांच्या व्यवसायात रक्कम गुंतविली असती तर आज जी काळजी वाटते- आणि ते साहजिकही आहे- ती वेळच आली नसती, असे नेहमी माझ्या मनात येत असते.”
“पैशाची त्यांना जरूर होती आणि माझी इच्छा ज्यांना जे हवे होते त्यांना देऊन साहाय्य करावयाची होती. गुलाबचंदांची जेवढी माझ्यावर भक्ती होती आणि जेवढा माझा त्यांच्यावर विश्वास होता तेवढेच हे बुडविणारेही होते, मला जवळचेच होते. गुलाबचंदांचे साहाय्य मी घेतलेय, नाही असे नाही; पण जनतेकडून घेतलेला पैसा परत लहान लहान लोकांना उपयोगी पडला तर पाहावे, असे माझे धोरण नि इच्छा, कल्पना होती आणि बुडीत नाही कोण? मोठा व्यवसायी बुडत नाही किंवा बुडवत नाही असेही नाही. अर्थात शेठजींबद्दल हे नाही म्हणत मी. पण सर्वसाधारण अनुभव येतो तो सांगितला इतकेच. त्यामुळे रकमा बुडल्याचे मला काही वाटत नाही!” (क्रमशः)

संकलन : नमिता वारणकर

संदर्भ पुस्तक : सावरकरांशी सुखसंवाद

लेखक : श्री.पु.गोखले
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.