
Solapur : हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर (Netaji Palkar) यांच्या ऐतिहासिक शुद्धीकरणाला (घरवापसीला) तिथीनुसार यंदा २ ऑगस्ट २०२६ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ आषाढ वद्य चतुर्थी हा दिवस ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) आरंभलेल्या शुद्धीकरण मोहिमेच्या स्मरणार्थ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अशोक चौक येथील जुने वालचंद कॉलेज रोडवरील चिप्पा मार्केटजवळील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे हिंदु जनजागृती समिती (Hindu Janjagruti Samiti) आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट (Sunil Ghanwat) यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे, हिंदुराष्ट्र सेनेचे शहर संघटक आनंद मुसळे आणि रवी गोणे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांना मुघल सत्तेच्या काळात औरंगजेबाने तलवारीच्या धाकाने आणि अनन्वित छळ करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. तब्बल १० वर्षांनंतर मुघलांच्या तावडीतून निसटून ते रायगडावर शिवछत्रपतींकडे आले. महाराजांनी केवळ त्यांचे विधिवत शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने स्थान दिले नाही, तर आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या मुलाशी करून देऊन ‘रोटी-बेटी व्यवहार’ही प्रस्थापित केला. छत्रपतींचा हा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – POK मधील हिंसाचार पोहचला लाहोरपर्यंत; पोलिसांनी आंदोलकांवर केली कारवाई)
आज ३५० वर्षांनंतरही प्रलोभने, फसवणूक आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या षड्यंत्रांद्वारे हिंदूंचे धर्मांतर सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर समाजात वैचारिक जागृती करण्यासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महंत मावजीनाथ हे ‘हिंदु धर्माची श्रेष्ठता आणि धर्मांतर का करू नये’, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट ‘हिंदु राष्ट्रासाठी घरवापसीची आवश्यकता व पुढील दिशा’, सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक सर्वेश मेंहदळे ‘भारताची सद्यस्थिती आणि शुद्धीकरण मोहिमेची आवश्यकता’, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित ‘शुद्धीकरण विधीची वैशिष्ट्ये व लाभ’, तर हिंदुराष्ट्र सेनेचे रवी गोणे ‘शुद्धीकरण कार्यातील प्रत्यक्ष अनुभव’ या विषयांवर आपले विचार मांडतील.
या ऐतिहासिक कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आणि घरवापसीच्या कार्याला बळ देण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेनेच्या ९७६२७२१३०४ व ८०९०१२०२५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
