प्रतिनिधी
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अखेर पावसाचे आगमन झाले असून, अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांपासून ते मध्य मुंबईपर्यंत पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वरळी, लोअर परळ, अंधेरी, विलेपार्ले, दादर आणि वांद्रे परिसरात पावसाच्या सरी बरसल्या असून, नवी मुंबई आणि ठाण्यातही पावसाचा जोर कायम आहे. एल निनोच्या संकटामुळे यंदा मान्सून(Monsoon)तब्बल १५ ते १७ दिवस लांबला होता, मात्र आता पावसाचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.
(हेही वाचा – BEST Bus Strike : सरकारकडून मागण्या मान्य; बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे )
हवामान विभागाने मुंबईसाठी आज ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे, तर पुढील दोन दिवस शहरात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्याने २४ ते २६ जून दरम्यान महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. गेल्या १५ दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत सक्रिय झाला आहे.(Monsoon)
कोकण किनारपट्टीवरही पावसाने काहीसा जोर पकडला आहे. सिंधुदुर्गातील कणकवली आणि कुडाळ भागात पडलेल्या हलक्या सरींमुळे भातशेतीला थोडा दिलासा मिळाला असला, तरी शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर वसमतसह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने, मेघराजा आता जोरदार बरसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता पावसाचा हा जोर पुढील काळात कसा असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.(Monsoon)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

