वडापाव व इतर अन्नपदार्थ पॅकिंगसाठी (FDA) अथवा थेट संपर्कात येईल अशा प्रकारे छापील कागदाचा वापर करणे हे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अशा वापरास मनाई असल्याबाबतच्या सूचना यापूर्वी जारी केल्या आहेत. मात्र, तरीही अशा प्रकारे खाद्यपदार्थ छापील कागदात गुंडाळून देणाऱ्या २६ दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत १ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. (FDA)
हेही वाचा-FIFA World Cup 2026 : एमबाप्पेच्या दोन गोलांच्या जोरावर फ्रान्सने सेनेगलवर ३-१ ने विजय मिळवला
५ जून ते १६ जून या कालावधीत याबाबत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात ५५ अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यात २६ आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ पॅकिंग किंवा विक्रीसाठी छापील कागदाचा वापर होत असल्याचे आढळले. कारवाईत उल्लंघन झाल्याची २६ प्रकरणे नोंद झाली असून १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. संबंधित अन्न व्यावसायिकांकडून १ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम मुंबई विभागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. (FDA)
अन्नपदार्थ गरम असताना किंवा तेलकट पदार्थ छापील कागदात गुंडाळल्यास शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी छापील कागदाचा वापर बंद करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन एफडीएने केले. अशा तपासणी मोहिमा नियमित राबविण्यात येणार असून नियमांचे मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महेश चौधरी यांनी दिला. (FDA)
Join Our WhatsApp Community

