
-
प्रतिनिधी
Dawoodi Bohra Succession Controversy दाऊदी बोहरा समाजाच्या उत्तराधिकार वादावर निकाल दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गौतम पटेल यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मागील १० महिन्यांपासून न्यायमूर्ती पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांना निनावी धमकीची पत्रे पाठवून छळ केला जात असून, आता थेट त्यांच्या लंडनस्थित मुलीच्या निवासस्थानी धमकीचे पत्र पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती पटेल यांनी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Dawoodi Bohra Succession Controversy)
२४ एप्रिल २०२४ रोजी न्यायमूर्ती पटेल यांनी दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे ‘दाई अल-मुत्लाक’ म्हणून सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे पद कायम राखणारा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. २०१४ मध्ये सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांच्या निधनानंतर त्यांच्या भावाने आणि नंतर त्यांच्या पुतण्याने केलेल्या दाव्यांवर न्यायमूर्तींनी सुनावणी केली होती. वादी पक्ष पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरल्याचे नमूद करत न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवरच न्यायमूर्तींना धमकावले जात आहे. (Dawoodi Bohra Succession Controversy)
(हेही वाचा – MSRTC : एसटीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन)
५ जून रोजी न्यायमूर्तींच्या मुलीच्या लंडन येथील घरी एक धमकीचे पत्र आले, ज्यावर जर्मनीचा टपाल शिक्का आहे. या पत्रात त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत, कुटुंबाविरुद्ध ‘कॉन्ट्रॅक्ट’ देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासोबत एक डिजिटल स्टोरेज डिव्हाइसही पाठवण्यात आले असून, ते आता लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. गुन्हेगारांनी न्यायमूर्तींकडे एक विचित्र मागणी केली आहे. त्यांनी १० लाखांच्या बोहरा समाजाच्या आध्यात्मिक नेत्यांबाबतचा तो निकाल “दबाव आणि जबरदस्तीखाली” दिला होता, अशी कबुली देणारा माफीनामा व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करावा, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. (Dawoodi Bohra Succession Controversy)
न्यायमूर्तींच्या पत्नीलाही मुंबईत अशीच धमकीची पत्रे मिळाली आहेत. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर, यूके दौऱ्यावर असलेले भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय उच्चायुक्त पी. कुमारन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर लंडन पोलिसांनी न्यायमूर्ती पटेल यांच्या मुलीला आणि कुटुंबाला सुरक्षा प्रदान केली आहे. भारतीय उच्चायुक्तालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षेबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर प्रलंबित असून, न्यायमूर्ती पटेल यांनी दिलेल्या निकालाला वादींनी आव्हान दिले आहे. या धमकीच्या सत्रामुळे न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Dawoodi Bohra Succession Controversy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
