Pune : महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरी गडावर, सोमवती यात्रेच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला. देवदर्शनासाठी आलेल्या काही जणांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत, वाद सोडवायला आलेल्या स्थानिकांनाही मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हिंसक प्रकारात स्थानिक नागरिकांसह एकूण १२ जण जखमी झाले असून, घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उपलब्ध माहितीनुसार, कल्याण येथून सुमारे ३० ते ३५ जणांचा भाविकांचा गट सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी येथे आला होता. हे सर्वजण जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका निवासस्थानी थांबले होते. दुपारच्या सुमारास काही जणांनी मद्यपान केल्यानंतर त्यांच्यामध्येच काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे परिवर्तन पुढे जोरदार हाणामारीत झाले.
वाद मिटवायला गेलेल्यांनाही चोप
गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच हॉलचे मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मध्यस्थी करत भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या मद्यपींनी त्यांच्यावरच दगड आणि दांडक्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर परिसरातील काही स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे आले, परंतु त्यांनाही मारहाण करण्यात आली. दगडफेकीत आणि हल्ल्यात अनेक जण जखमी झाले.
जखमींमध्ये स्थानिक रहिवासी आणि कल्याणहून आलेले काही भाविक यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा: Crime News : पित्याचा संताप अनावर, लेकीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, पत्नीलाही… गुन्ह्यामागचे कारण उघड
घटनास्थळी दारूच्या बाटल्यांचा खच
जेजुरी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस पोहोचेपर्यंत काही संबंधित व्यक्ती तेथून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळाच्या पाहणीत मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि रिकामे बॉक्स आढळल्याने मद्यधुंद अवस्थेमुळेच हा गोंधळ वाढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.
ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत भाविक आणि स्थानिकांमध्ये वाद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वीही जेजुरी परिसरात भाविकांकडून स्थानिकांशी गैरवर्तन आणि मारहाणीचे प्रकार घडल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी किरकोळ वादातून एका दुकानदारावर हल्ला झाल्याची घटनाही समोर आली होती.
या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा: वसई-विरारमध्येही Tukaram Mundhe यांचा दणका; कारवाईअंतर्गत १८ दुकाने सील, १९ जणांना अटक
Join Our WhatsApp Community

