- कल्याण : प्रतिनिधी
स्फोटाने हादरलेली एमआयडीसी फेज दोन आता दारूड्यांच्या अर्थात समाजकंटकांच्या ताब्यात गेली असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रोबेस स्फोट झालेल्या डब्ल्यू-१६० ते डब्ल्यू-२५१ या लेन मधील कारखान्यासमोर रोज सायंकाळी दारूड्यांचा अड्डा जमा होतो आहे. दुचाकी आणि इतर वाहनांतून येणारे काही तरूण आणि मध्यमवयीन दारूडे सायंकाळ ते रात्री उशिरापर्यंत गटाराच्या बाजूला बसून दारूसह इतर व्यसने करतात. त्यांचे हैदोस न थांबणारे आहेत.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच वेळेत परिसरातील कंपन्यांतून महिला कर्मचारी सुटतात. कामावरून घरी जाणाऱ्या महिलांच्या समोरच हे दारूडे उघड्यावर दारू ढोसत एकमेकांना शिवीगाळ करत असतात. नशेत कोणते दुष्कृत्य करतील याचा भरवसा नसल्याने नोकरदार महिला भयभीत झाल्या आहेत. शिवाय रस्त्याचे जाणाऱ्या पादचारी महिलांमध्ये प्रचंड दहशत आहे. नोकरदार महिला तर कामावरून सुटल्यावर घाबराघुबऱ्या घरी परततात. हे नशेखोर ठराविक मास्टर्स डीलाईट (Master’s Delight) नावाची दारू ढोसतात. पिल्यानंतर लाल रंगाच्या प्लास्टिक बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, चाखण्याच्या कागदी बशा आणि पेपर सरळ गटारात फेकून देतात. शिवाय हे दारूडे उघड्यावरच लघुशंका करत असतात. गटारात प्लास्टिक आणि बाटल्यांचा खच जमला आहे. केडीएमसी (KDMC) आणि एमआयडीसी (Dombivli MIDC) प्रशासनाकडून ही गटारे कधीच साफ केली जात नाहीत. त्यामुळे दुर्गंधीने परिसर कोंडून गेला आहे.
(हेही वाचा – Mumbai Heatwave Update : अचानक एवढा उकाडा का वाढला? हवामान तज्ज्ञांनी सांगितलं उष्णतेमागचं ‘हे’ मोठं कारण )
समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी
दारूड्यांना हा सारा तमाशा कंपन्यांतून सुटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसमोर चालतो. आपसात शिवीगाळ, महिलांकडे पाहून अश्लील शेरेबाजी, नशेतली बेभान अवस्था, या प्रकारांमुळे नोकरदार महिला घाबराघुबऱ्या होऊन घर गाठतात. एखाद्या वेळेस नशेत काही अनर्थ झाला तर जबाबदार कोण ? असा सवाल या परिसरातील महिला उद्योजक वर्षा महाडिक यांनी विचारला आहे. मानपाडा पोलिस, केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासनाकडे फोनवरून तोंडी तक्रार केली आहे. अशा समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वर्षा यांनी केली आहे. स्फोटाने जागा झालेली एमआयडीसी पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अराजकांच्या उंबरठ्यावर आहे. महिला सुरक्षित नाहीत, स्वच्छता नाही, दारूड्यांचा हैदोस सुरूच आहे. तरीही प्रशासन गप्प का ? असा सवाल नोकरदार आणि पादचारी महिलांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

