Crime : ऑनलाइन लोन ॲपच्या वसुली बहाद्दरांचा ‘धिंगाणा’; १७ लाखांची वसुली करूनही मुलीवर ॲसिड हल्ल्याची धमकी

61
Police team with arrested suspects in loan app case
Crime : ऑनलाइन लोन ॲपच्या वसुली बहाद्दरांचा ‘धिंगाणा’; १७ लाखांची वसुली करूनही मुलीवर ॲसिड हल्ल्याची धमकी
  • प्रतिनिधी 

Crime                   मरोळ परिसरात ऑनलाइन लोन ॲपच्या जाळ्यात अडकलेल्या एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याची दीड वर्षात तब्बल १७ लाख ६० हजार रुपयांची लुटालूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ काही हजार रुपयांच्या कर्जापोटी आरोपींनी पीडित कुटुंबाला मानसिक छळ, मारहाण आणि थेट मुलीवर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट २ ने धडाकेबाज कारवाई करत टोळीतील सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.सुदेश वाघरे, पवेश गोरीवले, प्रवीण जाधव, प्रवीण थोराट, रवी जयसवाल आणि वाल्मीकि गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Crime)

मरोळ-मरोशी रोड परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय अक्षय ओमप्रकाश सिंह यांनी एका ऑनलाइन ॲपद्वारे काही हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते, मात्र काही दिवसांतच हे कर्ज त्यांच्यासाठी दुस्वप्न ठरले. फेडलेल्या कर्जावर ५१२ टक्के व्याजाची मागणी करत आरोपींनी त्यांना वेठीस धरले. विशेष म्हणजे, १७ लाखांहून अधिक रक्कम देऊनही आरोपींची भूक शमली नाही. (Crime)

(हेही वाचा – Dombivli च्या निवासी विभागात स्वयंपुनर्विकासाचा केंद्रबिंदू; मनसे नेते राजू पाटील यांनी सुचवला पर्याय)

पीडित व्यक्तीने पैसे देण्यास असमर्थता दर्शवताच आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांना आणि कार्यालयातील सहकाऱ्यांना फोन करून बदनामी करण्यास सुरुवात केली. २ डिसेंबर २०२५ रोजी आरोपींनी सिंह यांच्या घरी जाऊन कुटुंब संपवण्याची धमकी दिली. त्यानंतर २२ मे २०२६ रोजी बँकेबाहेर गाठून त्यांना मारहाण करण्यात आली. ‘कॅश माय पेमेंट’ ॲपशी संबंधित असलेल्या या टोळीने थेट पीडिताच्या लहान मुलीवर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्याने संपूर्ण कुटुंब दहशतीखाली होते. (Crime)

तपासात असे समोर आले आहे की, हे आरोपी पीडिताच्या मोबाइलमध्ये ‘एपीके’ (APK) फाइल इन्स्टॉल करून त्यांचा वैयक्तिक डेटा चोरत असत. याच डेटाच्या आधारे ते पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे उकळत होते. गुन्हे शाखेने या सहा जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आणि या रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.