Legislative Council : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत कुरघोडी; ठाणे, पुणे, कोकणात प्रतिष्ठेची लढाई

84
Legislative Council : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत कुरघोडी; ठाणे, पुणे, कोकणात प्रतिष्ठेची लढाई
Legislative Council : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीत कुरघोडी; ठाणे, पुणे, कोकणात प्रतिष्ठेची लढाई
  • ​विशेष प्रतिनिधी

​राज्यात गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ विधान परिषदेच्या (Legislative Council) जागांसाठी अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. १८ जून रोजी यासाठी मतदान होणार असून, या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात भलतेच तापले आहे. नोव्हेंबरपासून सुरू असलेला निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. आधी नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधान परिषदेच्या या १७ जागांवरून महायुतीमधील तिन्ही मित्रपक्षांमध्ये – भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस – वर्चस्वाची मोठी लढाई पाहायला मिळणार आहे.

​विशेषतः ठाणे-पालघर, पुणे, छत्रपती संभाजीनगर-जालना, परभणी-हिंगोली, अहिल्यानगर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या ७ अतिशय महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे शिलेदार उमेदवारी मिळवण्यासाठी एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकले आहेत.

(हेही वाचा – Israel Lebanon Air Strike: इस्रायलचा दक्षिण लेबनॉनवर हल्ला, १५ जणांचा मृत्यू)

​ठाण्याचा ‘गड’ कुणाचा? संख्याबळात भाजप सरस, प्रतिष्ठेसाठी शिवसेना आग्रही

उप​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सध्या कमालीची ईर्ष्या पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातील आकड्यांचे गणित पाहता भाजप थेट वरचढ दिसत आहे. भाजपकडे तब्बल ४४४ मतांचे तगडे संख्याबळ आहे, तर शिंदे यांची शिवसेना आणि निलेश सांबरे गटाची मिळून ३४६ मते आहेत. ताकदीच्या जोरावर भाजप (BJP) या जागेवर स्पष्ट हक्क सांगत असताना, उपमुख्यमंत्र्यांच्या होमग्राउंडवर शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे इथे महायुतीतच थेट मैत्रीपूर्ण लढत रंगणार की काही नवीन राजकीय समीकरणे आकाराला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​कोकणात शिवसेनेची ‘बॅटिंग’, राष्ट्रवादी बॅकफूटवर तर भाजपचाही डोळा

​कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला मानला जायचा. परंतु, बदललेल्या राजकीय समीकरणात इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी झेप घेतली आहे. एकूण ८३१ मतदारांपैकी एकट्या शिवसेनेचे २८९ सदस्य असून, या बळावर शिवसेनेने जागेवर दावा ठोकला आहे. भाजप २८५ सदस्यांसह अगदी काठावर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अवघ्या १०६ सदस्यांवर आटोपली आहे. परिणामी, या जागेवरून महायुतीत मोठा कलगीतुरा रंगण्याचे संकेत मिळत आहेत.

​पुण्यात अजित पवारांचे पारडे जड, पण भाजपचा ‘दौंड’ डाव

​पुणे जिल्ह्यातील सुमारे ८०४ मतदारांपैकी सर्वाधिक ३४७ सदस्य अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्याखालोखाल भाजप ३१९ सदस्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. शिवसेनेकडे ६८, काँग्रेसकडे १९, शरद पवार गटाकडे १७ तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे ११ मते आहेत. जरी राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असले, तरी दौंड नगरपालिकेतील नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ही पारंपरिक जागा राष्ट्रवादी स्वतःकडे राखणार की भाजप ती खेचून आणणार, यावर जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

​परभणी-हिंगोलीत त्रिअंकी सामना; बंडाची टांगती तलवार

​परभणी-हिंगोली मतदारसंघातील आकडेवारीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही जागा सुटू शकते. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपकडे इच्छुकांची मोठी फौज असल्याने तेही या जागेसाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील आक्रमकता कायम ठेवत शिंदे सेनाही या जागेसाठी हटून बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेने माजी आमदार विप्लव बाजोरिया (Viplav Bajoria) यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याने उमेदवारीवरून तिन्ही पक्षांत कमालीचा ताण निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi 93 : जेव्हा संजीव गोयंकांनी उभं राहून वैभव सूर्यवंशीला दिली मानवंदना)

​यवतमाळमध्ये ‘इच्छुकांची’ जत्रा; अहिल्यानगरमध्ये विखे विरुद्ध तनपुरे सामना!

  • ​यवतमाळचा तिढा: या मतदारसंघात भाजपकडे १३७ तर शिंदे सेनेकडे ९३ मते आहेत. महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडे ११० मते आहेत. भाजपकडून मदन येरावार, सुमीत बाजोरिया आणि नितीन भुतडा शर्यतीत आहेत, तर शिंदे सेनेकडून सलीम खेतानी, पांडव आणि साहेबराव कांबळे शड्डू ठोकून आहेत.
  • ​अहिल्यानगरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा: दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनानंतर साडेतीन वर्षे रिक्त असलेल्या या जागेवर आता महासंग्राम होणार आहे. महाविकास आघाडीकडून राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तर महायुतीकडून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आमनेसामने येण्याची दाट शक्यता असल्याने ही निवडणूक संपूर्ण राज्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

​छत्रपती संभाजीनगर-जालन्यात शिवसेनेच्या गडावर भाजपचा झेंडा?

​छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आता चित्र पूर्णपणे पालटले आहे. दोन्ही महापालिकांवर भाजपची एकहाती सत्ता असून, संभाजीनगर जिल्हा परिषद आणि ९ पैकी ६ नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. जालन्यातील ३ पैकी २ नगरपालिकांवरही भाजपचेच वर्चस्व आहे. या प्रचंड बहुमताच्या जोरावर भाजप या जागेवर हक्क सांगत आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील या जागेसाठी आग्रही आहेत. विरोधकांमध्ये फारसा उत्साह नसल्याने महायुतीचा विजय सुकर असला, तरी त्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे एकमत होणे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.