
-
प्रतिनिधी
Suraj Chavan विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही चलबिचल किंवा अंतर्गत मतभेद नसून, काहीजण जाणीवपूर्वक पक्षात अस्थिरता असल्याचे खोटे चित्र निर्माण करत आहेत,” असा थेट पलटवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हेच सातत्याने पक्षात फूट पडल्याचे वातावरण तयार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला. (Suraj Chavan)
(हेही वाचा – ‘सायकल चालवा, शहर वाचवा’चा नारा; Kalyan-Dombivli मध्ये ७ जूनला भव्य सायकल रॅली)
सूरज चव्हाण यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सर्व काही सुरळीत सुरू आहे. पक्षामध्ये कोणतेही मतभेद नसताना विरोधक आणि काही माध्यमांकडून जाणीवपूर्वक चुकीचे चित्र रंगवले जात आहे.” रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाचा समाचार घेताना चव्हाण म्हणाले की, कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर मोठी विधाने करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम रोहित पवार करत आहेत, जे एका जबाबदार लोकप्रतिनिधीला अजिबात शोभत नाही. (Suraj Chavan)
(हेही वाचा – नीट पेपरफुटी प्रकरण: ‘आरसीसी’ चे संचालक Shivraj Motegaonkar यांना ९ दिवसांची सीबीआई कोठडी )
पक्षातील कथित नाराजीच्या चर्चांमागे एक मोठे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त करत चव्हाण यांनी सांगितले की, काही राजकीय विरोधक विशिष्ट एजन्सींची मदत घेऊन जाणीवपूर्वक संभ्रम पसरवत आहेत. प्रत्यक्षात सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष एकदिलाने उभा आहे. याचवेळी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या पक्षाच्या अधिकृत नेत्यांच्या यादीवरून निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी पडदा टाकला. “निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्रात झालेली चूक ही केवळ एक तांत्रिक आणि ‘क्लेरिकल मिस्टेक’ (कारकुनी चूक) होती. त्यामध्ये कोणताही राजकीय सुप्त हेतू नव्हता. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याविषयी सोशल मीडियावरून वस्तुस्थिती मांडली असून, लवकरच सर्व दुरुस्त्या करून अद्ययावत यादी निवडणूक आयोगाकडे पुन्हा सादर केली जाईल,” असे स्पष्ट करत सूरज चव्हाण यांनी पक्षांतराच्या आणि नाराजीच्या सर्व कंड्या फेटाळून लावल्या. (Suraj Chavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
