-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan-Dombivli जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय सायकल दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, पोलिस विभाग आणि बी. के. बिर्ला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ७ जून रोजी सकाळी ६.३० वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. KDMC Steps Towards Sustainability & Safety For Society Buildings या जनजागृती उपक्रमांतर्गत ही रॅली कल्याण आणि डोंबिवलीतून एकाच वेळी निघणार आहे. पर्यावरण संरक्षण, आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा सदर रॅलीमागचा उद्देश आहे. (Kalyan-Dombivli)
रॅलीची सुरूवात कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बी. के. बिर्ला कॉलेजपासून होणार असून महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते सदर रॅलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे ओ. पी. चितलांगे, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर डोंबिवलीतील वै. हभप संत सावळाराम महाराज क्रिडासंकुलातून रॅलीला सुरूवात होणार असून या रॅलीचे उद्घाटन उपमहापौर राहूल दामले आणि सभागृह नेता वरूण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या दोन्ही रॅली प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक भागातून फिरून पुन्हा सुरूवातीच्या ठिकाणी समाप्त होतील. (Kalyan-Dombivli)
(हेही वाचा – Eknath Shinde: संत आणि वारकऱ्यांवरचा अन्याय सहन करणार नाही, एकनाथ शिंदे यांचा इशारा)
फक्त रॅली नाही, तर ७ मुद्द्यांवर जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात निवासी सोसायट्यांमध्ये शाश्वत विकास आणि सुरक्षिततेवर भर दिला जात आहे. गेल्या काही महिन्यांत ६ चर्चा सत्रेही झाली आहेत. या संदर्भात लक्ष केंद्रित केलेले ७ मुद्दे आहेत. यात कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर, वृक्षारोपण, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट आणि फायर सेफ्टी उपाययोजना यांचा समावेश आहे. सोसायट्यांतील पदाधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने मार्गदर्शन करून शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवणे हा रॅलीमागील उद्देश असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता तथा नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांनी सांगितले. (Kalyan-Dombivli)
सहभागींना काय मिळणार?
गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केलेल्या सायकलस्वारांना टी-शर्ट, मेडल आणि अल्पोपहार दिला जाणार आहे. कल्याण सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, बाईक पोर्ट, एव्हरग्रीन, पलावा सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकल क्लब, पेडल रिपब्लिक यांच्यासह अनेक सायकल क्लब आणि पर्यावरणप्रेमी यात सहभागी होणार आहेत. कल्याण-डोंबिवलीकरांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Kalyan-Dombivli)
अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२३८६५२३३
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

